माझ्या पुढे गेलासच कसा; ट्रकचालकाची अरेरावी, चारचाकी चालकाला मारहाण
By नितीश गोवंडे | Updated: January 4, 2024 14:20 IST2024-01-04T14:19:17+5:302024-01-04T14:20:29+5:30
ट्रकचालकाच्या मारहाणीने चारचाकी चालक गंभीर जखमी

माझ्या पुढे गेलासच कसा; ट्रकचालकाची अरेरावी, चारचाकी चालकाला मारहाण
पुणे : किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोहगाव वाघोली रोडवर अशीच एक घटना ३ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा ते पाऊणच्या सुमारास घडली. माझ्या पुढे गेलासच कसा असे म्हणत एका ट्रक चालकाने चारचाकी चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कॅजीटन माईकल डिसोझा (२०, रा. सुप्रिम आंगण सोसायटी, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅजीटन यांचे वडील माईकल डिसोझा हे त्यांची चारचाकी घेऊन लोहगाव वाघोली रोडने जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या एका ट्रक (एमएच १२ एमव्ही ४१७२) चालकाने त्यांच्या गाडीसमोर ट्रक थांबवला. त्यानंतर ट्रक चालकाने खाली उतरत माईकल डिसोझा यांच्याजवळ हातात लोखंडी रॉड घेऊन येत ‘तु माझ्या पुढे गेलासच कसा’ असे म्हणत त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत माईकल डिसोझा हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंदन करत आहेत.