पौडला भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:57 IST2025-02-23T17:56:40+5:302025-02-23T17:57:19+5:30
या तिघांनाही पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,

पौडला भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर
कोळवण : पौड (ता. मुळशी) येथे शासकीय गोदामासमोर शनिवार (दि. २२ फेब्रुवारी) रोजी रात्री बाराच्या दरम्यान झालेल्या स्वीफ्ट व इरटिका गाडीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्वीफ्ट कार (एमएच १२ व्हीटी २७०८) ही मुळशीकडून पौडकडे तर इरटिका गाडी (एमएच ०४ एलक्यू २०३५) पौडकडून मुळशीकडे चालली होती. रात्री बाराच्या दरम्यान या दोन्ही गाड्या समोरासमोर एकमेकांवर आदळल्या. यामध्ये स्वीफ्ट गाडीतील तुषार रवींद्र घुमे (वय ३४), संदेश दत्तात्रय कुडले व तुषार अंकुश वाघवले (तिघेही रा. पौड, ता. मुळशी) हे गंभीर जखमी झाले होते.
या तिघांनाही पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तुषार घुमे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर संदेश कुडले व तुषार वाघवले हे गंभीर जखमी झाले असल्याने दोघांनाही पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
तर इरटिका कारमधील अजय बंडू राठोड, अरविंद वसंत जाधव, शुभम राठोड (सर्व रा. उजना, अहमदपूर) हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. या तिघांनाही पुण्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. इरटिका गाडीवरील चालक (नाव, पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली. रवींद्र काशिनाथ घुमे (वय ६३, रा. पौड कॉम्प्लेक्स, ता. मुळशी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे करीत आहेत.