घरातच थाटले हुक्का पार्लर, फोनवर ऑर्डर घेऊन देत होते सेवा, विमाननगर भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:29 IST2025-11-28T13:29:38+5:302025-11-28T13:29:56+5:30
पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून ३४ हुक्का पॉट, शेगडी, फिल्टर पाइप, चिलीम, हुक्का फ्लेव्हर्स, असे एक लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे

घरातच थाटले हुक्का पार्लर, फोनवर ऑर्डर घेऊन देत होते सेवा, विमाननगर भागातील घटना
पुणे: घरात हुक्का पार्लर थाटून, फोनद्वारे ऑर्डर घेऊन सेवा देणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून ३४ हुक्का पॉट, शेगडी, फिल्टर पाइप, चिलीम, हुक्का फ्लेव्हर्स, असे एक लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. अश्रफ निजाम्मुदीन अन्सारी (२५), असलान फिरोज अन्सारी (२४) आणि गुलजार निजामुद्दीन अन्सारी (२५) (तिघे सध्या रा. म्हाडा कॉलनी विमाननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश), अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी हरिप्रसाद नवनाथ पुंडे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या तिघांविरोधात तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलिसांचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गल्ली क्रमांक पाच, म्हाडा कॉलनी येथे तीन जण अवैध पद्धतीने हुक्का विक्री करीत आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२६) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पथकाने म्हाडा कॉलनीतील एका सदनिकेत छापा टाकला. यावेळी तिघा आरोपींनी विविध प्रकारचे हुक्का फ्लेव्हर्स, तसेच हुक्का ओढण्याच्या साहित्याचा साठा केल्याचे दिसून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. चौकशीत हे तिघे ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे ग्राहकांना बाहेर जाऊन हुक्का सर्व्हिस देत असल्याचे समोर आले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे निरीक्षक शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने केली.