राजकीय पदाधिकऱ्याचा भावाच्या फार्म कॅफेत हुक्का पार्लर; जागा मालक, मॅनेजरसह कामगारावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:07 IST2025-11-11T12:06:56+5:302025-11-11T12:07:23+5:30
कॅफे मालक हा विरोधी पक्षातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले

राजकीय पदाधिकऱ्याचा भावाच्या फार्म कॅफेत हुक्का पार्लर; जागा मालक, मॅनेजरसह कामगारावर गुन्हा
पुणे : शेतात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी कारवाई करत ४८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित हुक्का पार्लर औंध-बाणेर लिंक रोडवरील ‘फार्म कॅफे’मध्ये सुरू होता. यावेळी पोलिसांनी २० हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य जप्त केले. यातील गंभीर बाब म्हणजे हा प्रकार एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या भावाच्या कॅफेमध्ये सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी कॅफे मालक अमित वाळके (रा. औंध), मॅनेजर बलभीम कोळी, चालक विक्रमकुमार द्वारकाप्रसाद गुप्ता (२३), वेटर सुरज संजय वर्मा (२४) आणि राजकुमार चन्नू अहिरवाल (१९, सर्व रा. बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागामालक अमित हा विरोधी पक्षातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले होते. त्यावेळी तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना औंध बाणेर लिंक रोडवरील शेतात हुक्का विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेबाराच्या सुमारास सर्व्हे क्रमांक २२४ येथील ‘फार्म कॅफे’वर छापा टाकला. या कॅफेमध्ये ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरीत्या तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. दरम्यान, बेकायदेशीरपणे हुक्का बार चालवताना आढळल्याने पोलिसांनी एकूण पाच आरोपींविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य रस्त्यापासून १०० ते १५० मीटर अंतरावर मुळा नदीच्या कडेला हुक्का विक्री सुरू होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे हे करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, आश्विनी ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे आणि पथकाने केली.