पुण्यात ऑनर किलिंग? अल्पवयीन मुलीचा बापानेच केला खून, विष पिउन स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 12:05 IST2023-02-10T12:04:27+5:302023-02-10T12:05:01+5:30
विषारी औषध प्राशन केल्याने मुलीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू

पुण्यात ऑनर किलिंग? अल्पवयीन मुलीचा बापानेच केला खून, विष पिउन स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न
पुणे/किरण शिंदे: पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा सख्या बापानेच खून केला आणि तिचा मृतदेह कॅनॉल मध्ये फेकून दिला. त्यानंतर स्वतः बापाने ही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुश्री शिंदे (वय 13) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खून केल्यानंतर आरोपी पित्याने तनुश्रीचा मृतदेह वाहत्या कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील दोन तासांपासून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप मृतदेह सापडला नाही. विषारी औषध प्राशन केल्याने मयत मुलीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वारगेट पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.