हिटलर हाच आरएससचा आदर्श तर काँग्रेस करुणा समतेला मानणारा राजकीय पक्ष - हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:13 IST2025-09-20T17:13:01+5:302025-09-20T17:13:12+5:30
आरएसस कडून नेहमीच आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत असे सांगितले जाते व त्याचवेळी ते राजकीय पक्ष काढून राजकारणही करतात

हिटलर हाच आरएससचा आदर्श तर काँग्रेस करुणा समतेला मानणारा राजकीय पक्ष - हर्षवर्धन सपकाळ
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर्श हिटलर आहे, समता नाकारणारी मनुस्मृती त्यांना महत्वाची वाटते तर काँग्रेस करुणा समतेच्या विचारांना धरून चालते. वैचारिक पातळीवर त्यांना कायमच विरोध करणारा काँग्रेस हा एकमेव देशव्यापी राजकीय पक्ष आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
श्रमिक पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना लक्ष्य केले, त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाऐवजी भाजपचे नेते का पुढे येतात? असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसची राजकीय भूमिका विस्ताराने विषद केल्यावर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. राजकारण सर्वच गोष्टींमध्ये आहे असे स्पष्ट करतानाच त्यांनी काँग्रेसला मास बेस पार्टीबरोबरच आता केडर बेस पार्टीही करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
सपकाळ म्हणाले, “आरएसस कडून नेहमीच आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत असे सांगितले जाते व त्याचवेळी ते राजकीय पक्ष काढून राजकारणही करतात. त्यांनी स्विकारलेली मनुवादी विचारधारा त्यांच्या आधीपासूनची आहे. त्याविरोधात गौतम बुद्ध, भगवान महावीर, व पुढे संत चोखामेळा, संत तुकाराम यांनी संत मंडळींनी विद्रोह केला. सावित्रीबाई यांच्यावर पुण्यात शेणगोळ्यांचा मारा करणारे कोणी पारशी वा मुस्लिम, ख्रिश्चन नव्हते तर मनुवादीच होते. काँग्रेसने या विचारधारेला कायमच विरोध केला.”
काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला अशी टीका केली जाते. काँग्रेस पूर्वीपासूनच मास बेस पक्ष होता. त्यामुळेच जे आले ते सत्तेच्या गादीवर बसले. आता आम्ही काँग्रेसला केडर बेस पक्ष करण्याचा प्रयत्न करत आहोत असे सपकाळ यांनी सांगितले.