काम पूर्ण न झालेल्या स्थानकांना वगळून धावणार हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘डेडलाइन’ चुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:30 IST2025-12-27T18:30:06+5:302025-12-27T18:30:53+5:30
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील २३ पैकी ११ स्थानकांचे काम अपूर्ण असून, त्यातील सरकते जिने, प्रतीक्षालये व पार्किंग सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत

काम पूर्ण न झालेल्या स्थानकांना वगळून धावणार हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो; मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘डेडलाइन’ चुकली
पिंपरी : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन ३ या २३.३ किलोमीटरच्या उन्नत मार्गावर २३ स्थानके प्रस्तावित आहेत. त्यांचे काम पूर्ण करून मेट्रो मुदतीत सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, मुदतवाढ दिल्यानंतरही काम पूर्ण होणार नसल्याने अशा अपूर्ण स्थानकांना वगळून मेट्रो सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर उर्वरित स्थानकांचे काम पूर्ण करता येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा माण–हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाइन ३) प्रकल्प लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री तथा ‘पीएमआरडीए’चे पदसिद्ध अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते; मात्र प्रत्यक्षात सुमारे नऊ टक्के काम अपूर्ण असल्याने आणखी सहा महिने थांबावे लागणार आहे.
सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे आतापर्यंत ९१ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचा दावा ‘पीएमआरडीए’ करत आहे. मेट्रो मार्गिकेवरील पूल, रुळांचे काम पूर्ण झाले असून दोन ट्रेनसेट दाखल झाले आहेत. विविध गतीनुसार चाचण्या पार पडल्या आहेत. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी कामाला सुरुवात झालेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च ८,३१२ कोटी रुपये आहे.
मूळ मुदत होती मार्च २०२५ पर्यंतची!
दरम्यान, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने जुलैमध्ये सर्व विभागांची बैठक घेतली होती. ‘सिंगल पॉइंट ॲथॉरिटी’ची निर्मिती करून विभागीय आयुक्तांकडे जबाबदारी दिली होती. त्याच बैठकीत डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, भूसंपादन, विविध परवानग्या आणि जागेचा ताबा मिळण्यातील अडचणींमुळे प्रकल्पास विलंब झाला. मूळ मुदत मार्च २०२५ पर्यंतची असताना, ती वाढवावी लागली. कामाची गती अपेक्षेप्रमाणे न वाढल्याने मेट्रो प्रशासनाला दोन नोटिसाही देण्यात आल्या.
२३ पैकी ११ स्थानकांचे काम अपूर्ण
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील २३ पैकी ११ स्थानकांचे काम अपूर्ण असून, त्यातील सरकते जिने, प्रतीक्षालये व पार्किंग सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. अखेर प्रकल्पाला ५४३ दिवसांची मुदतवाढ देत ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली. दरम्यान, कामाची गती वाढली असून, शेवटचे टप्पे लवकरच पूर्ण होतील. मेट्रो लवकरच धावेल, असा दावा ‘पीएमआरडीए’ने केला आहे.