Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू होणार; सध्या या प्रकल्पाचे सुमारे ९४.२० टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:52 IST2026-03-20T15:52:05+5:302026-03-20T15:52:58+5:30
Pune Metro शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता असून, खासगी वाहनांवरील ताणही काही प्रमाणात कमी होणार आहे.

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू होणार; सध्या या प्रकल्पाचे सुमारे ९४.२० टक्के काम पूर्ण
पुणे: पुणेकरांसाठी आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाइन ३) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील १२ स्थानके मे २०२६ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (दि. १९) प्रत्यक्ष ‘ग्राउंड’ पाहणी करत प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
औंध येथील बैठकीनंतर आयुक्तांनी माण ते शिवाजीनगर या २३.२ किलोमीटर लांबीच्या संपूर्ण मार्गिकेवरील २३ स्थानकांची पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते. कामाचा वेग वाढवताना गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी कंत्राटदारांना दिल्या. कागदोपत्री अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची सद्य:स्थिती त्यांनी तपासली. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगच्या तांत्रिक चाचण्या सुरू आहेत. आरडीएसओ आणि सीएमआरएस तपासणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता, ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता असून, खासगी वाहनांवरील ताणही काही प्रमाणात कमी होणार आहे.
मे २०२६ पर्यंत १२ स्थानकांचा पहिला टप्पा सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे. सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल.- डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए.