PMC: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा हेमंत रासने यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:52 IST2022-03-04T14:44:40+5:302022-03-04T14:52:01+5:30
पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती

PMC: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा हेमंत रासने यांची निवड
पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज सकाळी स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने हेमंत रासने यांची निवड निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा हेमंत रासने यांची निवड झाली आहे.
हेमंत रासने यांनी १० विरूद्ध ६ असा विजय मिळवून राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला आहे. नगरसेवक हेमंत रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत २८ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी १ मार्च ते १४ मार्च या १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक ठरणार आहेत.
स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही भाजपने दगाफटका होऊ नये यासाठी व्हीप काढला होता. रासने यांचा विजय निश्चित असल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते.