वानवडी : पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली येऊन एका २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ७) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास गंगा सॅटेलाइट परिसरातील नाल्यावरील पुलाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या वाहनचालक वेगाने वाहने चालवतात, त्यामुळे अपघात होऊन अनेकांचा जीव जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच एका १९ वर्षीय तरुणाचाही वाहनाच्या धडकेत बळी गेला होता.
ग्रासीया डोरा (वय २४, रा. नॅन्सी टॉवर, केदारीनगर, वानवडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर संबंधित टँकरचालक संतोषकुमार मोर्या (वय ४५, रा. नेताजीनगरजवळ, मूळ बिहार) हा पोलिस चौकीत हजर झाला आहे. संबंधितांवर मृत तरुणीच्या घरच्यांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगा सॅटेलाइट येथून नेताजीनगरजवळ लष्कर हद्दीत पाणी भरण्यासाठी जाणारा टँकर डावीकडे वळत असताना दुचाकीवरून नांदेड सिटी येथे कामावर जाणाऱ्या तरुणीला धडक बसली. धडकेनंतर ती खाली पडली आणि टँकरच्या पुढील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तरुणीने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, अपघातावेळी हेल्मेट बाजूला पडल्याने डोक्यावर गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. हेल्मेटची पट्टी नीट लॉक न केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, चालकाने डावीकडे वळण्याचा सिग्नल दिला होता. मात्र, तरुणी अचानक कोठून आली, हे समजले नाही, असे त्याने सांगितले. अपघातात नेमकी चूक कोणाची, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
अपघातानंतर मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृत तरुणीचे वडील चेन्नई येथे असून आई व बहीण वानवडीत राहतात, अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सारिका शिर्के पुढील तपास करत आहेत.
दोन दिवसांत दोन बळी...
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी क्लाऊड ९ परिसरात पाण्याच्या टँकरच्या धडकेत १९ वर्षीय फुटबॉलपटू आरीझ शेख याचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी सुरू असतानाच आणखी एक अपघात घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अवजड वाहनांवर कारवाई करा
वानवडी व परिसरात टँकर, डंपर व इतर अवजड वाहनांची बेफाम वाहतूक वाढली असून, यामुळे वारंवार अपघात होत आहेत. संबंधित वाहनांवर कडक कारवाई करावी, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. तसेच ठिकठिकाणी वेगावर नियंत्रण यावे, यासाठी गतिरोधक उभारावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Web Summary : A 24-year-old woman died in Wanwadi after being hit by a water tanker. Her helmet came off during the accident. Speeding vehicles are causing concerns. Another accident happened two days prior, claiming a 19-year-old's life. Locals demand strict action against heavy vehicles.
Web Summary : वानवडी में पानी के टैंकर से टक्कर लगने से 24 वर्षीय युवती की मौत हो गई। दुर्घटना के दौरान उसका हेलमेट निकल गया। तेज गति से चलने वाले वाहनों से चिंता बढ़ रही है। दो दिन पहले एक और दुर्घटना में 19 वर्षीय युवक की जान चली गई। स्थानीय लोगों ने भारी वाहनों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है।