पुणे : गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात पावसाची केवळ रिपरिप सुरू होती. मात्र, सोमवारपासून शहरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काल शहरात सकाळपासूनच हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. आजही सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही (दि. १९) आकाश ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. धरण परिसरातही होत असलेल्या पावसामुळे चारही धरणांत दिवसभरात सुमारे पावणेदोन टक्के पाणीसाठा वाढून एकूण साठा २६.८० टीएमसी अर्थात ९२ टक्के झाला आहे. आजच्या पावसानंतर पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
शहरात यंदा जुलैमध्ये गेल्या चार वर्षांतील नीचांकी पाऊस नोंदवला गेला. त्यानंतर ऑगस्टमध्येही पावसाने पाठ फिरवली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. तर सोमवारी सकाळपासून मध्यम पावसाला सुरुवात झाली. तीन दिवसांच्या सलग सुटीनंतर कार्यालयांमध्ये हजेरी लावणाऱ्या नोकरदारांना यामुळे रेनकोट घालूनच मार्गक्रमण करावे लागले. या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळपासून वाढला जोर
पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला आहे. त्यामुळे त्यामुळे सखल भागांत रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. काही प्रमुख मार्गांवर खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शिवाय सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडण्यास पसंती दिली. टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रोड, तसेच मध्यवर्ती भागातील अप्पा बळवंत चाैक, नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनचालकांना शिस्त लागणार कधी?
पाऊस असो की, नसो शहरात कायमच वाहतूक कोंडी होते. याला वाहनचालकांची बेशिस्त हे प्रमुख कारण आहे. रस्त्यामध्ये थोडी जरी वाहने अडकली तर दुचाकीचालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने घुसवतात. त्यामुळे मागून येणाऱ्यांना, तसेच पुढे जाणाऱ्यांची अडचण होते. काही बेशिस्त चालकांमुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो.
आज पाऊस
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शहर व परिसरात मंगळवारीही आकाश समान्यत: ढगाळ राहून दिवसभर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात खूप जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
खडकवासला प्रकल्पात ९२ टक्के पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे चारही धरणांत मिळून रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २६.१४ टीएमसी अर्थात ८९.६७ टक्के पाणीसाठा होता. रात्रभर झालेल्या आवकेमुळे सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हा साठा २६.३२ टीएमसी झाला. त्यानंतर सोमवारी पावसाने जोर पकडल्याने पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली. खडकवासला धरण परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत १६, पानशेत परिसरात ५९, वरसगावमध्ये ५४, तर टेमघर धरण परिसरात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी दिवसभरातील या ११ तासांमध्ये खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा तब्बल पावणेदोन टक्क्यांनी वाढला. हा साठा सायंकाळी पाच वाजेपर्यंत २६.८० टीएमसी अर्थात ९१.९४ टक्के इतका झाला आहे. सध्या चारही धरणांमध्ये ४८४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते १८ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १७९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ ४४.९ मिलिमीटरच पाऊस पडला आहे.
गेल्या पाच वर्षांतील ऑगस्टमध्ये पुणे शहरात नोंदवला गेलेला पाऊस (मिमी)
२०२४ – २७९.३२०२३ – ४२.१२०२२ – १६४.२२०२१ – ४०.६२०२० – २५५.७
शहरात रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये)
शिवाजीनगर २९.७पाषाण २८.९हडपसर १८मगरपट्टा १७.५लोहगाव १९चिंचवड २९लवळे ३७
जिल्ह्यातील पाऊस
गिरीवन ३२.५तळेगाव १९दौंड ५.५बारामती ४.६निमगिरी ४डुडुळगाव ३.५तळेगाव ढमढेरे ३राजगुरूनगर २.५