अतिवृष्टीचा तमाशा फडाला फटका, निम्मे बंदच, कला जगवण्यासाठी मोठी कसरत - मंगला बनसोडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:53 IST2025-10-27T13:52:48+5:302025-10-27T13:53:01+5:30
तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुणतुण, पेटीमास्तर, नर्तिका, चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभर जणांचा लवाजमा असतो

अतिवृष्टीचा तमाशा फडाला फटका, निम्मे बंदच, कला जगवण्यासाठी मोठी कसरत - मंगला बनसोडे
कळस : तमाशा उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा, ढोलकीचा ताल, घुंगराचे बोल असा साज व गण, गौळण, लावणी, बतावणी व वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला, दिल्लीच्या तख्ताचीही वाहवा मिळवलेला, मात्र यावर्षी अतिवृष्टीचा फटका त्यालाही बसला. आठ महिने चालणारे १५ फड असताना केवळ आठच फड विजयादशमीला रिवाजानुसार लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. त्यांना कला जगवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, अशी खंत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
दोन वर्षे कोरोनात गेली. यानंतरही प्रेक्षकांची पाठ व यावर्षी अतिवृष्टीचा फटका या गर्तेत हे फडमालक अडकले आहेत. दरवर्षी १५ फड पूर्णवेळ असताना केवळ आठच फड विजयादशमीला रिवाजानुसार लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. पावसाचा त्यांना जबरदस्त फटका बसला आहे. काही मोजकेच शो करून हे फड थांबून आहेत. सुमारे २२५ लहान-मोठे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रत्येक वर्षी विजयादशमीला सर्व फड बाहेर पडतात. तत्पूर्वी महिनाभर कलाकारांची जुळवाजुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, विजेची व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी मोठा खर्च येतो. १०० रुपये तिकीट दर असताना तिकीट काढून तमाशा पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे काही फड बंद ठेवले आहेत. अर्थकारण बिघडल्याने ते आता जानेवारीत बाहेर पडण्याचे नियोजन करत आहेत. गावोगावच्या यात्रा सुरू होतात. यात्रा कमिटीकडून ‘सुपारी’ घेऊनच शो करण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे. यावर्षी विजयादशमीला मंगल बनसोडे, रघुवीर खेडकर, मालती इनामदार, हरिभाऊ बडे, आनंद महाजन, विठाबाई नारायणगावकर, पांडुरंग मुळे, तुकाराम खेडकर-मांजरवाडीकर हे आठच फड लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. फाल्गुन महिन्यात पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे ‘सुपारी’ घेण्यासाठी फड मालक एकत्र येतात. तत्पूर्वी दिवाळीनंतर सांगली जिल्ह्यातील विटा - मायणी रस्त्यावर राहुट्या मारून ‘सुपारी’ घेतल्या जातात.
कला जगवण्यासाठी कसरत
तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुणतुण, पेटीमास्तर, नर्तिका, चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभर जणांचा लवाजमा असतो. लोखंडी स्टेज, तंबू, गेट, चार राहुट्या, जनरेटर, साऊंड सिस्टीम हे साहित्य व कलाकारांचा लवाजमा नेण्यासाठी पाच ट्रक व एक जीप असते. फडातील सर्वांचे दोनवेळचे जेवण व वाहनांतील डिझेल हा सर्व डोलारा सांभाळताना मोठी कसरत करावी लागते.