पुणे: गेल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये १५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
सर्वाधिक बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड (६ लाख २० हजार ५६६ हेक्टर), वाशीम (१ लाख ६४ हजार ५५७ हेक्टर), यवतमाळ (१ लाख ६४ हजार ९३२ हेक्टर), धाराशिव (१ लाख ५० हजार ७५३), बुलढाणा (८९ हजार ७८२ हेक्टर), अकोला (४३ हजार ८२८ हेक्टर), सोलापूर (४७ हजार २६६ हेक्टर), हिंगोली (४० हजार हेक्टर) याचा समावेश आहे. या पावसामुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
बाधित जिल्हे
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी,अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.