पुणे: पुणे शहराला रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः वेठीस धरले आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे अचानक रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी झाली. बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरासह उपनगर, ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे.
काल रात्रीनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळी सुद्धा पाऊस पडला नाही, मात्र सर्वत्र ढगाळ वातावरण झाले होते. दुपारनंतर अखेर पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने काही नागरिक रेनकोट, छत्री न घेता बाहेर पडले होते. पण अचानक पाऊस सुरु झाल्याने त्यांना आडोशाला थांबावे लागले. रस्त्यांना नेहमीप्रमाणे नद्यांचे स्वरूपही आले होते. अनेक भागात ट्राफिक झाले. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच धायरी, हडपसर, वाघोली, खराडी, चंदननगर, कॅम्प, औंध, बाणेर या उपनगरातही पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. अनेक सोसायटीमध्ये पाणीही शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
पावसाने रस्त्यांचे अक्षरशः वाजतगाजत तुकडे केले. रस्त्यांना आधीच खड्डे पडले आहेत. त्यातून असा पाऊस झाला कि त्यामध्ये अजूनही वाढ होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला ‘रस्त्यांची डागडुजी केली आहे’ अशी घोषणा पुणे महापालिकेकडून केली जाते. पण प्रत्यक्षात काही तास पाऊस झाला की रस्ते उखडून पडतात. नगर रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले असताना महापालिका मात्र खड्डे बुजवल्याची खोटी माहिती देऊन वेळ मारून नेते. वारंवार तक्रारी करत असतो, पण खड्डे बुजवले जात नाहीत. महापालिका केवळ टेंडर काढून ठेकेदारांना पैसे घालते. पण कामाची गुणवत्ता शून्य आहे.