पुणे तापले..! असह्य झळा, उकाड्याने हाल..आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:27 IST2025-04-10T11:26:09+5:302025-04-10T11:27:43+5:30
पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात फिरणे टाळावे,

पुणे तापले..! असह्य झळा, उकाड्याने हाल..आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार
पुणे : यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा तीव्र तडाका जाणवू लागला. असह्य झळा, अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरांत तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे नोंदवला गेला. यामुळे टोप्या, स्कार्फ, गॉगल परिधान करूनच घराबाहेर पडावे लागत आहे.
लोहगावमध्ये बुधवारी दिवसभरात ४२.२ आणि शिवाजीनगर येथे ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात फिरणे टाळावे, असा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.शहरात सोमवारी हंगामातील उच्चांकी ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. रात्रीचा उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मंगळवार सारखीच उन्हाची तीव्रता बुधवारी देखील कायम होती. दुपारी बारानंतर उन्हाचे चटके बसत होते.
अशी घ्या काळजी
शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, घामोळे आणि चक्कर येणे यासारख्या त्रासांची शक्यता असते. ताप, घाम न येणे, उलट्या, चक्कर, थकवा जाणवत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे. उन्हात बाहेर पडताना टोपी, छत्री, सनस्क्रिन वापरावे. लिंबूपाणी, नारळपाणी, ताक यांसारखे घरगुती पेय घ्यावे. झोपेची विशेष काळजी घ्यावी.