‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’, राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: December 5, 2023 12:35 PM2023-12-05T12:35:34+5:302023-12-05T12:35:58+5:30

राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे

Healthy health of youth glory of Maharashtra health screening of 1 crore men completed in the state | ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’, राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण

‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’, राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण

पुणे : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानांतर्गत आतापर्यंत १ कोटी ७२ हजार पुरुषांच्या मोफत आरोग्य तपासणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.

या अभियानासाठी विशेष अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर अॅपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषध उपचार तसेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, करण्यात आलेल्या चाचण्या, या माहितीची नोंद त्या ठिकाणी केली जाते.

तेरा हजार शस्त्रक्रिया 

हे अभियान १७ सप्टेंबर सुरू करण्यात आले होते. यात राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य तपासणी केलेल्या ९२ लाख लाभार्थ्यांच्या चाचण्या आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या असून त्यापैकी सोळा लाख लाभार्थ्यांना औषधोपचार देण्यात आलेले आहेत. सुमारे तेरा हजार लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या आहेत.

येथे होते तपासणी 

आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

या होतात तपासण्या

या सर्व आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत आणि गरजेनुसार आवश्यक शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये मोफत केल्या जाणार आहेत. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या प्रेरणेतून ही मोहीम सुरू आहे. 

Web Title: Healthy health of youth glory of Maharashtra health screening of 1 crore men completed in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.