Health system of Pune Municipal Corporation on 'Injection' of Central Government | आता बोला..! केंद्र सरकारच्या 'इंजेक्शन'वर पुणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था 

आता बोला..! केंद्र सरकारच्या 'इंजेक्शन'वर पुणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था 

ठळक मुद्देएनयुएचएम’ च्या वैद्यकीय सेवकांकडून आरोग्य विभागाला आधार ३६४ सेवक पालिकेच्या रूग्णालयांमध्ये कार्यरत 

नीलेश राऊत-
पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला ‘एनयुएचएम’ च्या वैद्यकीय सेवकांनी बळ दिले असून, शासनाकडून ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’ (एन.यु़एच.एम.) व प्रजनन व बाल आरोग्य (आर.सीएच.) या योजनांसाठीचा नियुक्त केलेले ३६४ आरोग्य सेवक आजमितीला महापालिकेच्या १९ प्रसुतीगृहे व ७० हून अधिक छोट्या मोठ्या दवाखान्यासह आरोग्य विभागांच्या विविध कार्यालयांमध्येच सेवा बजावत आहेत.

वर्ग एकच्या १५१ मान्य पदांपैकी केवळ ७ पदांवर नियुक्ती असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला,केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यदायी योजनांसाठीचा ३६४ जणांचा सेवक वर्ग संबंधित कामांसाठी नियुक्त करण्यात आला आहे. पण हे सर्व आरोग्य सेवक कोरोना आपत्तीत अग्रभागी राहून इतर वेळीही आपली सेवा महापालिकेच्या विविध रूग्णालयांमध्ये व कार्यालयांत बजावत आहेत.

कोरोना आपत्तीत सर्व यंत्रणांनी हातात-हात घालून काम केले.या काळात एनयुएचएम चा सेवक वर्गही अग्रभागी राहिला. परंतु, या आपत्तीच्या अगोदर व आता लसीकरण मोहिमेनंतर तरी महापालिका आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करणार आहे की नाही असा प्रश्न शहरातील सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकरिता शासन मान्यतेनुसार वैद्यकीय अधिक्षकपासून, न्यरोसर्जन, कार्डिओलॉजिस्ट ते फिजिशियनपर्यंतची १५१ पदे मंजूर आहेत़ पण आजमितीला यापैकी केवळ ७ जागांवरच नियुक्ती झाली असून, उर्वरित १४४ जागा रिक्त आहेत़ तर वर्ग दोनची ७८, वर्ग तीनची २३८ व वर्ग ४ ची २७३ पदे रिक्त आहेत. 
------------------------
खाजगी रूग्णालयांची तिजोरी भरण्याचे पालिकेचे काम 
महापालिकेच्या आरोग्य विभागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील वैद्यकीय सेवक शहराची आरोग्य यंत्रणा चालविण्यासाठी वापरण्यात येत आहे. शेकडो कोटी रूपयांची आर्थिक तरतूद असलेल्या आपल्या आरोग्य विभागाला सक्षम करण्यापेक्षा शहरी गरीब योजनेसारख्या योजना राबवून खाजगी रूग्णालयांची तिजोरी भरण्याचे काम महापालिका सध्या करीत आहे.
विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच
-------------------------

कोरोना आपत्तीत ‘एनयुएचएम’ चा वैद्यकीय सेवक वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य यंत्रणेबरोबर दिवसरात्र कार्यरत होता. मात्र या आपत्तीनंतर व पूर्वीही ज्या ठिकाणी हा सेवक वर्ग मूळ कामाव्यतिरिक्त वापरला जात होता.त्या सर्व महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘एनयुएचएम’ चा वैद्यकीय सेवक वर्ग मूळ कामी रूजू करण्याबाबतचे पत्र देण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा अहवालही मागविला जाणार असल्याची माहिती    ‘एनयुएचएम’राज्य मुख्यालयाकडून देण्यात आली आहे.
-------------------------
कोरोना आपत्तीत आरोग्य विभागासह महापालिकेच्या इतर सर्व विभागांनी एकत्रित काम केले. यात ‘एनयुएचएम’ चा वैद्यकीय सेवक वर्गही कार्यरत होता़ महापालिकेच्या आरोग्य विभागात‘एनयुएचएम’चा  सेवक वर्ग त्यांना दिलेल्या जबाबदारीवरच कार्यरत असतो. दरम्यान, आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच महापालिकेतील सर्व जागा भरल्या जातील. 
डॉ़आशिष भारती़ आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका़ 
--------------------------------
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health system of Pune Municipal Corporation on 'Injection' of Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.