भावनिक संदेश करून अचानक झाले होते गायब; अखेर दौंड तालुक्यातील 'तो' बेपत्ता पोलीस परतला घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:17 IST2025-12-11T15:16:58+5:302025-12-11T15:17:09+5:30
पोलीस ठाण्यावर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत अनावश्यक दडपण करून हे पोलीस कर्मचारी अचानक गायब झाले होते

भावनिक संदेश करून अचानक झाले होते गायब; अखेर दौंड तालुक्यातील 'तो' बेपत्ता पोलीस परतला घरी
केडगाव : यवत पोलीस ठाणे अंतर्गत केडगाव येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे हे गेल्या सहा दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. मानसिक तणाव, वारंवार होणारा प्रशासकीय दडपणाचा अनुभव आणि बदलीनंतरही अद्याप जुन्या प्रकरणांमध्ये गुंतवून ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी भावना व्यक्त करताना केला होता. ५ डिसेंबर रोजी त्यांनी “आपल्या जीवाचे काही बरे–वाईट घडू शकते” असा खोलवर भावनिक संदेश सहकाऱ्यांना पाठवल्यानंतर ते अचानक गायब झाले.
रणदिवे यांचा मोबाईलही या कालावधीत बंद असल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेची मोठी हालचाल झाली. त्याचदरम्यान, त्यांच्या घरी मुलीचा पहिला वाढदिवस असूनही ते उपस्थित राहू शकले नाहीत, यामुळे कुटुंबातही चिंतेचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यावर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. रणदिवे यांच्या कथित मानसिक तणावासंदर्भात पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, तसेच पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे दुर्लक्ष किंवा अनावश्यक दडपण केल्याचे आरोप स्थानिक पातळीवरून करण्यात आले आहेत.
शेवटी, सहा दिवसांच्या अनिश्चिततेनंतर १० डिसेंबर रोजी रणदिवे आपल्या मूळ गावी परतले. ते सध्या शिक्रापूर येथे कुटुंबासोबत सुरक्षित आहेत, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली. या संपूर्ण प्रकरणानंतर पोलीस विभागातील तणाव, कर्मचारी वर्गाचा वाढता मानसिक दबाव आणि प्रशासकीय संवादातील कमतरता या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. रणदिवे यांच्या प्रकरणातून पोलीस दलातील मानसिक आरोग्याच्या व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.