दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक
By नितीश गोवंडे | Updated: February 15, 2025 15:43 IST2025-02-15T15:36:03+5:302025-02-15T15:43:46+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे आरोपीवर दाखल आहेत

दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक
पुणे: ५० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराने कारागृहातून जामिनावर सुटताच पुन्हा दुचाकी चोरण्यास सुरूवात केली. गेल्या ५ महिन्यात त्याने २५ दुचाकी चोरल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. शंकर भरत देवकुळे (३२, रा. मेमाणी वस्ती, उरुळी देवाची) असे या सराईत वाहन चोराचे नाव आहे. त्याने गॅरेज मालकाच्या मदतीने चाेरीच्या गाड्या फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या असल्याचे सांगून त्यांची विक्री केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने त्याला अटक करत, २५ दुचाकी जप्त केल्या.
पर्वती येथील एक दुचाकी चोरीचा पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते तपास करत होते. या गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून ही चोरी शंकर देवकुळे याने केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणावरून शंकर देवकुळे याला इचलकरंजी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर तो पाच महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटून आला होता.
पुणे शहर व परिसरातून दुचाकी चोरी करुन तो गाड्यांच्या नंबरप्लेट काढून टाकायचा. त्यानंतर या गाड्या त्याचा ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनील कुदळे (२७, रा. खडकी, ता. दौंड) याला नेऊन देत असे. तो दौंडमधील खडकी येथील भैरवनाथ गॅरेज येथे विक्रीसाठी ठेवत असे. शंकर देवकुळे याचा तुळजापूरचा मित्र याच्याकडे त्याने दिलेल्या २ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच आणखी एका मित्राला विकलेली १ दुचाकी व त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेल्या ४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. अशी एकूण २५ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहनांबाबत पुणे शहर व इतर ठिकाणी वाहन चोरीचे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. उर्वरित ७ वाहनांच्या मालकांचा शोध सुरु आहे.
शंकर देवकुळे हा सराईत वाहनचोर आहे. त्याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाड्यांचे लॉक जुने झाले आहेत, अशा दुचाकी हेरून डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने तो त्यांची चोरी करायचा. शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुदळे याला ‘‘मी फायनान्स कंपनीत कामाला आहे. हप्ते न भरलेल्या गाड्या ओढून आणतो,’’ असे सांगत असे. त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता. अनिकेत हा कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे याला साथ देऊन त्या दुचाकी वाहनांचे चेसीस नंबर, व इंजिन नंबर ग्राईंडरने खराब करुन त्या दुचाकी गावातील शेतकऱ्यांना व गरजूंना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून विकत होता.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, सहायक फौजदार मधुकर तुपसौंदर, पोलिस कर्मचारी शंकर वाकसे, संजीव कळंबे, सुजित पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने केली.