‘ही मॅन’ धर्मेंद्र अन् ‘चॉकलेट हिरो’ जितेंद्र; ‘धरमवीर’ च्या जोडीनं रसिकांना घडवलं प्रेमाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 09:21 AM2023-01-24T09:21:14+5:302023-01-24T09:23:51+5:30

भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ गाजवणारे धर्मेंद्र अन् जितेंद्र हे चंदेरी दुनियेतील दोन तारे एकाच व्यासपीठावर अवतरले

'He Man' Dharmendra and 'Chocolate Hero' Jeetendra; The couple of 'Dharamveer' created a love scene for the fans | ‘ही मॅन’ धर्मेंद्र अन् ‘चॉकलेट हिरो’ जितेंद्र; ‘धरमवीर’ च्या जोडीनं रसिकांना घडवलं प्रेमाचं दर्शन

‘ही मॅन’ धर्मेंद्र अन् ‘चॉकलेट हिरो’ जितेंद्र; ‘धरमवीर’ च्या जोडीनं रसिकांना घडवलं प्रेमाचं दर्शन

googlenewsNext

पुणे : एकाचं वय ८८ अन् दुसऱ्याचं ८० वर्षे. पन्नास-साठीच्या दशकात या दोघांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ गाजवला. त्यातले एक होते ‘ही मॅन’ धर्मेंद्र अन् दुसरे ‘चॉकलेट हिरो’ जितेंद्र. हे चंदेरी दुनियेतील दोन तारे सोमवारी एकाच व्यासपीठावर अवतरले अन् पडद्यावर ‘सात अजुबे इस दुनिया मैं आठवी अपनी जोडी, ये है ‘धरमवीर’ की जोडी असे म्हणणाऱ्या दोघांनी एकमेकांना आलिंगन देत पुन्हा एकदा ‘धरमवीर’च्या अद्भुत प्रेमाचे दर्शन रसिकांना घडविले.

पडद्यावर साकार होणारी त्यांच्या गाण्यांची चित्रफीत... प्रत्यक्षात त्यांच्या उपस्थितीत सादर होणारी गाणी अन् त्यांनी प्रत्येक गाण्यांमागचा उलगडलेला आठवणींचा सुगंध... अशा भारावलेल्या वातावरणामुळे दोघांसह रसिकही भूतकाळात रमले.

निमित्त होते, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे. धर्मेंद्र-जितेंद्र यांना एकत्रित पाहण्यासाठी तरुणाईसह ज्येष्ठांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. वयाची ऐशी ओलांडली तरी ‘चिरतरुण’ असलेल्या धर्मेंद्र-जितेंद्र यांचे गारुड रसिकमनावर कायम आहे. याची प्रचिती आली. या वेळी ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल, सिंबायोसिसचे संस्थापक-संचालक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

जिओ स्टुडिओचे मराठी कंटेंट प्रमुख निखिल साने यांना ‘सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी धर्मेंद्र-जितेंद्र यांच्याशी संवाद साधला.

मी एका कार्यक्रमाला नाही तर परिवारात आलो आहे, अशी भावना धर्मेंद्र यांनी व्यक्त केली. पुण्यातील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, प्रभात स्टुडिओमध्ये मी शूटिंग केले आहे. मला ते गुरुकुल वाटायचे. जुने पुणे आज खूप आठवते. झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर कायम वंदन करायला यायचो असे सांगत ’काश यादो में जान होती तो पास बुला लेता, उस से बाते करता... अशी शायरीही त्यांनी पेश केली. जितेंद्र यांनीही मिश्किलपणे व्ही. शांताराम’ यांचा ‘गीत गाया पत्थरोने’ हा पहिला चित्रपट कसा मिळाला याची आठवण सांगितली. या वेळी ‘धरमवीर की जोडी’ या संगीत रजनीमध्ये धर्मेंद्र-जितेंद्र यांच्या गाण्यांची मालिका मकरंद पाटणकर, अली हुसेन, राधिका आपटे या कलाकारांनी सादर केली. कलाकारांच्या सादरीकरणाला दोघांनी मनमुराद दाद दिली.

निवृत्त होण्याचे मन करत नाही

निवृत्त झाल्यानंतर मस्त पुण्यात राहून उर्वरित आयुष्य घालवू असे वाटले; पण काय करू, निवृत्त होण्याचे मनच करीत नाही, असे सांगत धर्मेंद्र यांनी अजूनही मी रोमँटिक असल्याची मिश्कील टिप्पणी केली.

Web Title: 'He Man' Dharmendra and 'Chocolate Hero' Jeetendra; The couple of 'Dharamveer' created a love scene for the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.