पुण्यात रेल रोकोसाठी आले अन् गेटवर निवेदन देऊन गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 18:59 IST2021-10-18T18:59:32+5:302021-10-18T18:59:40+5:30
विविध मागण्यांसाठी संविधान आर्मीने सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर रेल रोकोचा इशारा दिला होता

पुण्यात रेल रोकोसाठी आले अन् गेटवर निवेदन देऊन गेले
पुणे : विविध मागण्यांसाठी संविधान आर्मीने सोमवारी पुणेरेल्वे स्थानकावर रेल रोकोचा इशारा दिला होता. मात्र, त्यास आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी स्थानकास प्रवेश करण्यास मज्जाव केला. परिणामी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्थानक व्यवस्थापकांना मागण्याचे निवदेन देऊन रेल रोको न करताच ते परत गेले.
दादर रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबडेकर दादर चैत्यभूमी असे नामांतर करणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परिवाराला राजकीय हेतूने बदनाम केले जात आहे ते थांबविणे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, रेल्वेतील खासगीकरण रद्द करणे, आदी विविध मागण्यांसाठी सोमवारचे रेल रोको होणार होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने परवानगी नाकारल्याने आंदोलनकर्त्यांना परत जावे लागले.
यावेळी स्थानक परिसरात विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी संविधान आर्मीचे संतोष मोटे, राकेश बग्गन, जगन सोनवणे, संदीप सपकाळ आदी उपस्थित होते. यावेळी आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.