हर्षवर्धन पाटीलही बदलाच्या मार्गावर ?; जनसंकल्प मेळाव्यात राजकीय निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:55 IST2019-09-01T20:50:45+5:302019-09-01T20:55:17+5:30
मागील तीन महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आघाडी धर्माचे पालन करत, सुप्रिया सुळे यांना ७१ हजार मताची तालुक्यातून आघाडी देऊन लोकसभेत विजयी केले.

हर्षवर्धन पाटीलही बदलाच्या मार्गावर ?; जनसंकल्प मेळाव्यात राजकीय निर्णय घेणार
पुणे (इंदापूर) : मागील तीन महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आघाडी धर्माचे पालन करत, सुप्रिया सुळे यांना ७१ हजार मताची तालुक्यातून आघाडी देऊन लोकसभेत विजयी केले. त्यावेळी लोकसभेला त्यांचे काम आम्ही करायचे व विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसने आपले काम करायचे असे स्पष्ट बोलणे झाले होते. असे असताना देखील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस दिलेला शब्द पाळताना दिसत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनता ४ सप्टेंबरला जो निर्णय घेईल, तीच माझ्या राजकारणाची पुढची दिशा असेल, असे स्पष्ट मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
इंदापूर शहरातील पाटील यांच्या निवासस्थानी संकल्प मेळाव्याची पूर्वतयारीची बैठक रविवार (दि. १) सप्टेंबर रोजी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनीआयोजित केली होती. यावेळी पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी इंदापुरच्या जागेबाबत शरद पवार यांची भेट घेतली मात्र, त्यांनीही जागा सोडण्याबाबत स्पष्ट वक्तव्य केले नाही. यामुळे बुधवारी (दि. ४) सप्टेंबर रोजी इंदापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यर्त्यांचा जो आग्रह राहील त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर जागा सोडणे संदर्भात निर्णय घेत नसल्याने इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यात येणार नाही, असे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेची सभा इंदापूर येथे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश स्पष्टपणे दिसून येत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. इंदापूर तालुक्याचा विकास होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून इंदापूर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.
इंदापूर येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करून राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून करून लढवावी, असा आग्रह इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.