हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:08 IST2025-04-02T11:08:19+5:302025-04-02T11:08:35+5:30
मागील काही महिन्यात या बनावट मालाचे वितरण पुणे शहरभर होत होते

हार्पिक, लायझोल, ऑल आऊट लिक्वीड; १ लाखांचा बनावट साठा जप्त, आंबेगाव पोलिसांचा गोडाऊनवर छापा
धनकवडी : आंबेगावपोलिसांनी एका गोडाऊनवर छापा टाकून ब्रँडेड कंपन्यांचे बनावट फिनेल, मच्छर पळविण्याचे लिक्वीड आणि चहा पावडरचा साठा मोठा जप्त केला. मागील काही महिन्यात याचे वितरण शहरभर होत होते. कंपन्यांचे कॉपीराईटचे हक्क बघणाऱ्या एजन्सीला खबर मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला. ॲश्युर आयपी प्रोटेक्शन (दिल्ली) कंपनीचे प्रतिनिधी अशफुद्दीन इनामदार (वय ४१, रा. चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उबेद आसिफ शेख (२९, रा. आंबेगाव खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गोडाऊनमधून सुमारे एक लाख ६० हजारांचे हारपिक, लायझोल लिक्विड, ऑल आऊट लिक्वीड, टाटा अग्नी चहाचा बनावट साठा सापडला. येथून शहरातील दुकानांमध्ये त्याची विक्री होत होती. दुकानदारही जादा कमिशन मिळत असल्याने हा माल ठेवत होते. दरम्यान, कंपन्यांचे कॉपी राईट बघणाऱ्या एजन्सीच्या प्रतिनिधींना याची खबर मिळाल्यावर त्यांनी काही दुकानांत जाऊन मालाची तपासणी केली. तेथे बनावट माल आढळल्यावर तो पुरवठा कोठून होतो, याची माहिती घेतली गेली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.