हर हर महादेव..., बंब बंब बोले..., पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवला शिव-पार्वती विवाह सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:07 IST2024-10-05T18:06:46+5:302024-10-05T18:07:43+5:30
भगवान शिव- माता पार्वती सह वीर हनुमान, देवर्षी नारद, नंदी आणि सर्व पुणेकरही विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते

हर हर महादेव..., बंब बंब बोले..., पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवला शिव-पार्वती विवाह सोहळा
पुणे : हर हर महादेव, बंब बंब बोले, कैलासाधिपती शंकर भगवान की जय या जयघोषात शिव - पार्वती विवाह सोहळा पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवला. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात शिव -पार्वती विवाह सोहळा थाटात साजरा झाला. नंदीवर विराजमान शंकर भगवान, भस्म लावलेले शिवभक्त, डमरूचा जल्लोष अशा वातावरणात सारसबागेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकातून सुरु झालेल्या वरातीचा समारोप मंदिरात झाला.
भगवान शिव- माता पार्वती सह वीर हनुमान, देवर्षी नारद, नंदी आणि सर्व गण सहभागी झाले होते. यावेळी पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थिती लावत हा अभूतपूर्व सोहळा अनुभवला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा 'सार्वजनिक नवरात्र उत्सव' मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे.
ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड आदी उपस्थित होते. प्रत्यक्ष शिव-पार्वती लग्नसोहळ्यात सहभागी प्रत्येक देवतांच्या वेशभूषेत कलाकार वरातीत सहभागी झाले होते. यावेळी भस्म देखील उधळण्यात आला.