भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसर्या सोमवारी भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा जय घोष करत सकाळी कोवळे ऊन दुपारी हलक्या श्रावण सरी व सायंकाळी दाट धुक्यामध्ये दोन लाख भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी शिवलिंगावर आकर्षक रंगीबेरंगी फुलांची व केळींच्या पानांची सजावट करण्यात आली. सोमवार (दि.४) आज पहाटे साडेचार वाजता मंदीर उघडण्यात आले गाभारा मंदिर व परिसराची साफसफाई झाल्यानंतर पाच वाजेच्या दरम्यान शिवलिंगावरती दुग्ध व महाजलाभिषेक पुजा करण्यात आली. या नंतर शंखनाद करत महाआरती करण्यात आली. या वेळी श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर लगेचच मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुसरा श्रावणी सोमवार आल्याने भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याची पहावयास मिळाली. भाविकांचा शनिवारचा ओघ पाहता रविवारी पहाटे पासुनच प्रचंड गर्दी झाली ही गर्दी सायंकाळी दहा वाजेपर्यंत होती. शिवलिंगाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देवस्थान कडुन आॅनलाईन दर्शन पास व मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन रांगेत उभे राहून दर्शनासाठी वेळ लागत असल्यामुळे जास्त मुखदर्शन घेऊनच परतत होते. यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बस स्थानक,मंदिराचा परिसर,गाभाऱ्यामध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते तर पायऱ्या व दर्शन बारी या ठिकाणी मंदिर सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हर हर महादेव! श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:29 IST