हाकेंचा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून राज्य अशांत करण्याचा डाव; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:43 IST2025-07-08T09:42:57+5:302025-07-08T09:43:07+5:30
महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या जाती जमातींमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी हाके यांच्यासारख्या अनेक मंडळींसह राज्यातील ठरावीक लोकांकडून वादग्रस्त बेताल वक्तव्य केली जात आहेत.

हाकेंचा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून राज्य अशांत करण्याचा डाव; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
पुणे: सारथी संस्थेला दिलेल्या निधीवरुन महाज्योती बाबत कथित भेदभाव केल्याच्या निषेधार्थ बनावट प्राध्यापक पद लावून राज्य मागासवर्ग आयोगाची आणि शासनाची फसवणूक करणारे, लक्ष्मण हाके व काही विद्यार्थ्यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलनाचा स्टंट केला. तेव्हा विनाकारण त्यांनी सारथी संस्थेस व मराठा समाजास दिलेल्या सवलतींचा उल्लेख केला. त्यांनी त्यांचे आंदोलन करावे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या जाती जमातींमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी हाके यांच्यासारख्या अनेक मंडळींसह राज्यातील ठरावीक लोकांकडून वादग्रस्त बेताल वक्तव्य केली जात आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून राज्य अशांत करण्याचा हा डाव असल्याचा आरोप, मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे आणि राकेश गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
ओबीसी समाजात अनेक वर्षे काम करणारे अनेक मोठे नेते, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी याची माहिती घ्यावी. त्यांनी ओबीसीच्या नावावर दुकानदारी चालविणाऱ्या प्रवृत्तीला थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. हे प्रकार थांबले नाही तर त्याचे उत्तर त्या समाजाला न देता वादग्रस्त व्यक्तींना जशास तसे दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्रपुरुष, समाजपुरुष यांचेविषयी अपमानकारक वक्तव्य करणे, प्रसारमाध्यमात दोन समाजात तेढ निर्माण होणारी वादग्रस्त, बेताल वक्तव्ये करणारे कोणत्याही जाती धर्माचे असोत, त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गरजू विद्यार्थ्यांच्या योजनांना खीळ घालून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके यांचे आंदोलन ‘महाज्योती’च्या पीएच.डी. करणारे विद्यार्थ्यांसाठी आहे. महिन्याला ५० हजार रुपये मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाचे वित्तीय नियम डावलून फेलोशिपसाठी नोंदणी दिनांकापासून पैसे द्यावेत, यासाठी शासनावर दबाव आणला. प्रत्यक्षात संस्थांनी जाहिरात देण्याच्या अगोदर तो विद्यार्थी कोठेही नोकरी न करता केवळ संशोधनच करत आहे, हे ग्राह्य धरून पैस देण्याची मागणी आणि त्यासाठी शासनावर व सारथीवर टीका करून गरजू विद्यार्थ्यांच्या योजनांना खीळ घालत आहेत, अशी टीका करीत सवाल कोंढरे आणि गायकवाड उपस्थित केला.