आरओ प्रकल्प चालकांच्या मनमानीला लगाम; सिंहगड रस्ता परिसरातील ४३ प्रकल्प पुन्हा सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:43 IST2025-03-12T09:42:01+5:302025-03-12T09:43:10+5:30
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने धायरी, नऱ्हे, खडकवासला, नांदेड व किरकटवाडी परिसरातील ४३ प्रकल्प पुन्हा एकदा सील

आरओ प्रकल्प चालकांच्या मनमानीला लगाम; सिंहगड रस्ता परिसरातील ४३ प्रकल्प पुन्हा सील
पुणे : दूषित पाणी व अन्नामुळे 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) आजाराची लागण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या आजाराने सर्वाधिक बाधित असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील आरओ प्रकल्प चालकांची मनमानी थांबलेली नाही. महापालिकेने लागू केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी न करताच अनेकांनी परस्परपणे प्रकल्प सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने धायरी, नऱ्हे, खडकवासला, नांदेड व किरकटवाडी परिसरातील ४३ प्रकल्प पुन्हा एकदा सील केले आहेत.
सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नऱ्हे, आंबेगाव परिसरत मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेकडून या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणी केली होती. यात अनेक आरओ प्रकल्पातील पाणी दूषित असल्याचे समोर आल्यानंतर हे प्रकल्प सील करून बंद केले होते. परंतु, त्यानंतरही काही प्रकल्प छुप्या पद्धतीने सुरू झाल्याची चर्चा हाेती.
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने गुणात्मकदृष्ट्या योग्य दर्जाचे पाणी देणाऱ्या व विहित निकषांची पूर्तता करणारे आरओ प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नियमावली जारी केली होती. या नियमावलीचे पालन करणे आरओ प्रकल्प चालकांना बंधनकारक करण्यात आले होते. नियमावलींची पूर्तता करणाऱ्या प्रकल्पांनाच ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार होती. तसेच या प्रकल्पांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकांवर देण्यात आली होती.
मात्र, महापालिकेची परवानगी न घेताच आणि नियमाची अंमलबजावणी न करताच अनेकांनी आरओ प्रकल्प पुन्हा सुरू केले होते. या प्रकल्पांची तपासणी करण्याची जबाबदारी दिलेल्या आरोग्य निरीक्षकांनी काहीच केले नसल्याने पाणीपुरवठा विभागाने सिंहगड रस्ता परिसरातील ५७ आरओ प्रकल्पांची तपासणी केली. यामध्ये केवळ ४ प्रकल्पांना परवानगी दिली. तर यामध्ये ४३ प्रकल्पांनी नियमावलीची पूर्तता केली नाही, तसेच महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हे सर्व ४३ प्रकल्प पुन्हा एकदा सील केले आहेत.
असे प्रकल्प सील केले....
नऱ्हे गाव - २१
नांदेड गाव - ०९
किरकटवाडी - ०८
खडकवासला - ०५