खडकवासला बोगद्याचे भूमिपूजन महिनाभरात होणार
By नितीन चौधरी | Updated: February 6, 2025 18:14 IST2025-02-06T18:10:17+5:302025-02-06T18:14:11+5:30
बोगदा पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.

खडकवासला बोगद्याचे भूमिपूजन महिनाभरात होणार
पुणे : खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान केल्या जाणाऱ्या बोगद्याचे भूमिपूजन येत्या महिनाभरात होणार आहे. कंत्राटदाराकडून प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली असून, बोगद्यातील राडारोडा काढण्यासाठी ५ ठराविक ठिकाणी बाह्यमार्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची गरज भासणार असून, ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. बोगदा पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.
बोगद्याच्या कामासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वी मान्यता दिली. जलसंपदा विभागाने आचारंसहितेपूर्वीच १६०० कोटी रुपयांच्या कामांसाठीची निविदा काढली होती. त्यानुसार या बोगद्याचे काम ‘मेघा इंजिनिअर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. येत्या महिनाभरात बोगद्याचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. बोगद्यातील राडारोडा जमिनीवर आणण्यासाठी बोगद्याच्या संपूर्ण २८ किलोमीटरच्या लांबीत किमान ४ ते ५ ठिकाणी स्वतंत्र जागा तयार केली जाणार आहे. ही जागा मोठ्या प्रमाणावर लागणार असल्याने त्यासाठी अतिरिक्त भूसंपादनाची गरज भासणार आहे. त्यामुळे या जागेचे संपादन सध्या करण्यात येत आहे. येत्या पंधरवड्यात हे भूसंपादन पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कंत्राटदाराला कार्यादेश मिळाले असल्याने त्याने प्राथमिक तयारी म्हणून कामगारांसाठी खडकवासला धरणाजवळ मजुरांचा तळ सुरू केला आहे. राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयातून येत्या महिनाभरात बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
हा बोगदा खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान असलेल्या कालव्याच्या ३४ किलोमीटर लांबीपैकी २८ किलोमीटर लांबीचा असून, जमिनीच्या ८० मीटर ते २४० मीटर खालून जाणार आहे. बोगद्याचे काम ड्रील आणि ब्लास्टिंग पद्धतीने केले जाणार असून, अंतर्गत व्यास ६.३ मीटर असणार आहे. बोगद्याच्या आतून सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाईल. या बोगद्यामुळे सुमारे तीन टीएमसी पाणी वाचणार आहे. याती निम्मे पाणी पुण्याला पिण्यासाठी देता येईल. उर्वरित पाणी ग्रामीण भागातील शेतीसाठी देण्याचे नियोजन आहे. परिणामी ३ हजार ४७१ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बोगद्यामुळे पाणी दीड हजार क्युसेक वेगाने वाहू शकणार आहे. बोगदा पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सध्याचा कालवा सुरूच राहणार आहे.