ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान; कृषक कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:09 IST2025-01-17T12:09:14+5:302025-01-17T12:09:35+5:30
बदललेल्या राजकीय समीकरणानंतर एकमेेकांविरोधात शड्डू ठोकलेले पवार कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आल्याचे बारामतीकरांना पाहावयास मिळाले. मात्र

ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान; कृषक कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर
बारामती :बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक या कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मयुरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणाची प्रतिकृती देऊन अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. बदललेल्या राजकीय समीकरणानंतर एकमेेकांविरोधात शड्डू ठोकलेले पवार कुटुंबीय या निमित्ताने एकत्र आल्याचे बारामतीकरांना पाहावयास मिळाले. मात्र, यामध्ये कोणाचाही अपेक्षित संवाद रंगला नसल्याचे चित्र दिसून आले.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर काका-पुतण्या, नणंद-भावजय देखील एका मंचावर एकत्र आले होते. यावेळी रोबोटने सत्कारासाठी लहान रोपटं आणलं. जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचं मंचावर पुकारण्यात आलं तेव्हा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचाही सत्कार सुप्रिया सुळे यांनी केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज दोन मंत्री याठिकाणी आले आहेत. आपण पुन्हा याठिकाणी याल, अशी अपेक्षा आहे. आता वर्षभर कुठलेही इलेक्शन नाही, त्यामुळे तिळगूळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया, असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छाही सुप्रिया सुळे यांनी सर्वांना दिल्या.
पहाटेचा शपथविधी आठवा -
सकाळी लवकर उठून कामाला लागण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. अजित दादांना माहिती आहे, मी उशिरा उठतो. दादांनी रात्रीच सांगितलं होतं. उद्याच्या दिवस तसदी घ्यावी लागेल. तेव्हा मी त्यांना म्हटलं जेव्हा गरज असते, तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो. नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा. मीच त्यावेळी पाठीमागे उभा होतो, अशी मिश्किल टिप्पणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
एकमेकांचा नामोल्लेख टाळला -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘आदरणीय पवारसाहेब’, यांसह विविध उपस्थित मंत्र्यांचा नामोल्लेख करून केली, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता थेट भाषणाला सुरुवात केली. ज्येष्ठ नेते पवार नेहमीच त्यांच्या भाषणाची सुरुवात उपस्थित मान्यवरांची नावे घेऊन करतात. मात्र, आजचे त्यांचे भाषण अपवाद ठरले.