पुणे : कन्नड येथील कारखाना खरेदीबाबत यापूर्वीही चौकशी झाली. त्यात माझ्या नावाचा उल्लेख नव्हता. ईडीने ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्या ९७ पैकी बहुतांश नेते हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यातील लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र, माझ्याविरोधात आता ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.सरकार ईडीच्या माध्यमातून माझा आवाज दाबत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. आमचे अनेक लोक पळून गेले. त्यांनी लाचारी स्वीकारली. मात्र, आम्ही तसे करणार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.कन्नड येथील साखर कारखाना खरेदी प्रकरणात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवार यांनी शनिवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत आरोपपत्राविषयी आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, २०१२ मध्ये शिखर बँकेकडून एका कारखान्यासाठी कर्ज घेतले होते. त्यासाठी हे आरोपपत्र दखल केले आहे. २००९ ला कन्नड सहकारी साखर कारखान्यासाठी पहिल्यांदा टेंडर निघाले. मात्र, बँकेने आर्थिक तफावत असल्याचा रिपोर्ट नाबार्डला २०११ ला दिला. तिसऱ्यांदा कन्नड कारखान्याचे टेंडर निघाल्यानंतर बारामती ॲग्रोने तो कारखाना घेतला. नाबार्डने त्यात १०० लोकांची नावे घेतली होती. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात ९७ लोकांची नावे होती. मात्र, त्यात माझे नाव नव्हते.आता न्यायालयीन लढाईआरोपपत्र दाखल केल्याने आता आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल. न्याय देवता मला न्याय देईल, असा विश्वास आहे. सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही ही लढाई लढू, विजय आमचाच होईल. आम्ही घाबरून पळणारे लोक नाही. आम्ही मराठी माणसे आहोत. दिल्लीसमोर कधीही झुकत नसल्याचे रोहित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस सत्तेत येण्यासाठी उदारमतवादी, मोठे मन दाखवू शकतील. मात्र, त्यानंतर चाणक्यनीतीच्या माध्यमातून मित्र पक्षांना संपवूनदेखील टाकतील. ते हुशार नेते आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.
सरकार ईडीच्या माध्यमातून माझा आवाज दाबतेय; आमदार रोहित पवारांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:56 IST