पुणेकरांसाठी खुशखबर ! एका आठवड्यात धरणांमध्ये आठ महिन्यांचे पाणी जमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 17:19 IST2019-07-30T17:17:12+5:302019-07-30T17:19:43+5:30
गेला आठवडा पुणे जिल्ह्यात पावसाने जाेरदार हजेरी लावल्यामुळे पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात माेठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे.

पुणेकरांसाठी खुशखबर ! एका आठवड्यात धरणांमध्ये आठ महिन्यांचे पाणी जमा
पुणे : जुलैच्या सुरुवातीपासून सुरु झालेल्या पावसाने पुणेककरांना चांगलाच दिलासा दिला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने मुठा नदीपात्रात पाणी साेडण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. त्यामुळे एका आठवड्यातच पुणेकरांना सात ते आठ महिने पुरेल इतका पाणीसाठा खडकवासला धरणसाखळीमध्ये जमा झाला आहे.
जून काेरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. शहरात व धरणक्षेत्रात पावसाच्या मध्यम ते जाेरदार स्वरुपाच्या सरी काेसळत आहेत. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये देखील माेठ्याप्रमाणावर पाणी जमा हाेत आहे. 22 जुलै राेजी खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांमध्ये एकूण 14.84 टीएमसी इतका पाणीसाठा हाेता. आठवडाभर झालेल्या जाेरदार पावसामुळे यात वाढ झाली असून आज हा पाणीसाठा 21. 88 टीएमसी इतका झाला आहे. आठवडाभरातच 7.4 टीएमसी इतका पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे. हे पाणी पुणेकरांना सात ते आठ महिने पुरेल इतके आहे.
दरम्यान सध्या खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. तर पानशेत 83.51, वरसगाव 68.36 तर टेमघर 60.64 टक्के भरले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी खडकवासला शंभर टक्के, पानशेत 99.71, वरसगाव 78.45 तर टेमघर 68.19 टक्के भरले हाेते.