पुणे: पुणेमेट्रोचा विस्तार झपाट्याने होत आहे. संपूर्ण पुणे शहरात मेट्रोचे जाळे होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पुण्यातील दोन नवीन मेट्रो मार्गिकांना मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे सांगितले की, सरकारने बुधवारी पुणे मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराला ९,८५८ कोटी रुपये खर्चाच्या मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाइन ४ (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि लाइन ४अ (नल स्टॉप-वारजे-माणिक बाग) ला मान्यता दिली.
केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मुरलीधर मोहोळ यांनी एक्स पोस्टवरून पुणेकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुण्यासाठी खराडी-खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका ४अ) मार्गांनी मोदी सरकारने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुणे मेट्रो रेल नेटवर्कच्या फेज-२ अंतर्गत लाइन ४ (खराडी–खडकवासला) आणि लाइन ४अ (नळ स्टॉप–वारजे–माणिक बाग) या दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये ₹९,८५७.८५ कोटींची तरतूद असून, पुढील ५ वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. या मार्गांना मंजुरी मिळावी यासाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या विस्तारामुळे ३१.६ किमीचे नवे नेटवर्क, २८ एलिव्हेटेड स्टेशन तयार होतील ज्यामुळे IT हब, व्यावसायिक परिसर, कॉलेजेस आणि प्रमुख निवासी भागांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नवीन लाईन्समुळे नळस्टॉप, वारजे, माणिक बाग आणि डेक्कन–स्वारगेट परिसराला प्रचंड फायदा होणार असून पुणेकरांसाठी ही खरोखरच चांगली बातमी आहे.
नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पुणेकरांची वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. मार्गिका 4 (खराडी ते खडकवासला) ची लांबी 25.52 किमी असून, यात 22 उन्नत (Elevated) स्थानके असतील. हा मार्ग खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासल्यापर्यंत असणार आहे. याव्यतिरिक्त, मार्गिका ४अ (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) ही 6.12 किमी लांबीची असून, यात 6 उन्नत स्थानके असतील. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी 31.64 किमी आणि स्थानकांची एकूण संख्या 28 आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ₹9857.85 कोटी खर्च अपेक्षित असून, पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील पूर्वेकडील, मध्यवर्ती आणि पश्चिमेकडील महत्त्वाचे भाग थेट जोडले जातील, ज्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सोपा होईल.
Web Summary : The central government approved two new Pune Metro routes, costing ₹9,858 crore. These lines, connecting Kharadi-Khadakwasla and Nal Stop-Manik Bagh, will span 31.6 km with 28 stations, enhancing connectivity across Pune. Project completion is targeted within five years.
Web Summary : केंद्र सरकार ने ₹9,858 करोड़ की लागत से पुणे मेट्रो के दो नए मार्गों को मंजूरी दी। खराडी-खडकवासला और नल स्टॉप-माणिक बाग को जोड़ने वाली ये लाइनें 28 स्टेशनों के साथ 31.6 किमी तक फैली होंगी, जिससे पूरे पुणे में कनेक्टिविटी बढ़ेगी। परियोजना पांच वर्षों के भीतर पूरी होने का लक्ष्य है।