पडद्यामागच्या कलाकारांसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दिलासा; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ५ लाखांचा विमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 14:54 IST2021-07-02T14:54:08+5:302021-07-02T14:54:15+5:30
कला क्षेत्रातील लोकांनी आपली जबाबदारी ओळखून इतर कलाकारांना देणार मदतीचा हात

पडद्यामागच्या कलाकारांसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दिलासा; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ५ लाखांचा विमा
पुणे: चित्रपट उद्योगात कोट्यवधींची उलाढाल होते, पण रंगभूमीच्या माध्यमातून लोकांच्या भावना जीवंत ठेवणार्या कलाकार आणि तंत्रज्ञांन उदरनिर्वाहासाठी तुटपुंजी रक्कमही मिळत नाही ही शोकांतिका आहे. कला क्षेत्रातील लोकांनी आपली जबाबदारी ओळखून इतर कलाकारांना मदतीचा हात दिला पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे गरजू कलाकारांना शासनातर्फे मदत देण्यासाठी केवळ मुंबई-पुण्याचा विचार करून उपयोग नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत विखुरलेल्या कलाकारांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. पडद्यामागील कलाकारांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाच लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.
संवाद पुणे आणि आनंदी वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पडद्यामागील 200 कलाकार-तंत्रज्ञांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघात विमा उतरविण्यात आला असून या विमा प्रमाणपत्रांचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, पडद्यामागे राहून रंगभूमीची सेवा करणारे रंगकर्मी दुर्लक्षित राहतात असे दिसून येते. रंगभूमीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांची संपूर्ण माहिती नसल्यामुळे शासनातर्फे मदत देण्यात अडचणी येतात. कलाकारांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. मदत देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचाच विचार करावा लागेल. कलाकारांना पूर्वीच्या काळापासून मिळत आलेला राजाश्रय आणि लोकाश्रय भविष्यातही मिळत राहावा.
कराच्या रूपातून मिळणार्या पैशाचा विनियोग काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. गरजूंना मदत करण्यासाठी शासनाची कर्ज काढण्याचीही तयारी आहे. कलाकारांची संपूर्ण माहिती संकलित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांचा जीव वाचविण्यास शासनाचे प्राधान्य असून कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतरच निर्बंध शिथिल करण्याचा मानस आहे.