राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या आणि पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्या नेहमीच सोशल मीडियावर धार्मिक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात. नुकताच नवले यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
निर्मला नवले यांनी पंढरपूरची वारी करुन घरी परतलेल्या वडिलांचे पाय धुवून त्यांचे औक्षण करताना आणि आशिर्वाद घेतानाचा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून नवले यांच्या कृतीचे तोंडभरून कौतुक केले जात आहे.
नवले यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "पांडुरंगाच्या दर्शनाने परतले आमचे बाबा, वारी ही श्रद्धेची, भक्तीची आणि आत्मिक समाधानाची यात्रा असते. माझे वडील पंढरपूर वारी करून आज घरी परतले… थकवा असेल पण चेहऱ्यावर समाधान आहे, पाय जड झालेत पण मन मात्र हलकं झालय! पांडुरंगाच्या दर्शनाने त्यांचं मन भरून आलं आणि आमचं घर पुन्हा भक्तीमय झालं." निर्मला यांनी इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ३ लाख लोकांनी पाहिले आहे आणि १३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
आषाढी वारी निमित्ताने पंढरपूर नगरी पांडुरंगाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली बघायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास विठ्ठल राखुमाईची शासकीय पूजा संपन्न झाली. विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर पंढरपुरात पाहायला मिळाला. चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची गर्दी केली होती.