Pune-Nashik Railway : जीएमआरटीमुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:00 IST2024-12-19T09:58:43+5:302024-12-19T10:00:37+5:30

रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली : या मार्गाचा पुन्हा नव्याने डीपीआर तयार होणार

GMRT causes disruption to Pune-Nashik railway line | Pune-Nashik Railway : जीएमआरटीमुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला लागला ब्रेक

Pune-Nashik Railway : जीएमआरटीमुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला लागला ब्रेक

पुणे : जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जायंट मोटोव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) दुर्बिणीवर पुणे-नाशिक सेमी हायस्पीडचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित पुणे-नाशिकरेल्वेमार्गालारेल्वे मंत्रालयाने पुन्हा परवानगी नाकारली आहे. यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. या मार्गाचा आता नव्याने डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) बनवला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत दिली.

‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या (महारेल) आणि रेल्वे मंत्रालय यांच्या वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरू होते. त्या संदर्भातील आराखडा तयार करून मंजुरीसाठी रेल्वे बोर्ड व पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले होते. त्याला अंतिम मंजुरी येणे बाकी होते; पण त्यात अनेक त्रुटी होते. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत बुधवारी सविस्तर माहिती दिली.

वैष्णव म्हणाले, पुणे आणि नाशिक या शहराला जोडण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल), महाराष्ट्र सरकारची संयुक्त उपक्रम कंपनी आणि रेल्वे मंत्रालय यांनी डीपीआर तयार केला आहे. डीपीआरमधील प्रस्तावित मार्ग नारायणगावमधून जात होता. त्या ठिकाणी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) यांनी जीएमआरटी वेधशाळा स्थापित केली आहे. जीएमआरटीमध्ये जगातील ३१ देशांतील वैज्ञानिक निरीक्षणांसाठी त्यांच्या सेवा वापरतात. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा वेधशाळेच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे हा मार्ग करताना अनेक अडचणी येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेने येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

 तीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

नाशिक : साईनगर शिर्डी (८२ कि.मी.), पुणे-अहमदनगर (१२५ कि.मी.) दरम्यान नवीन दुहेरी मार्ग आणि साईनगर शिर्डी-पुणतांबा (१७ कि.मी.) दरम्यान नवीन दुहेरी मार्ग अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वेक्षण मंजूर करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर या मार्गाचा डीपीआर तयार केला जाणार आहे. तसेच, पुणे-नाशिक दरम्यानची रेल्वे दळणवळण यंत्रणा सुधारण्यासाठी २४८ किलोमीटर लांबीच्या दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यांपैकी १७८ किलोमीटरचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. 

Web Title: GMRT causes disruption to Pune-Nashik railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.