लिफ्ट देणे दुचाकीस्वाराला पडले महागात; धमकी देऊन पैसे हिसकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:51 IST2023-11-20T14:51:23+5:302023-11-20T14:51:35+5:30
धमकी देत जबरदस्तीने पैसे हिसकावल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली

लिफ्ट देणे दुचाकीस्वाराला पडले महागात; धमकी देऊन पैसे हिसकावले
पुणे : एका तरुणाला लिफ्ट देणे दुचाकीस्वाराला महागात पडले. ' मी आत्ता एकाला मारुन आलो आहे, मला पैसे दे नाहीतर मी तुला पण मारीन, अशी धमकी देत जबरदस्तीने पैसे हिसकावल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
विशाल कांबळे (वय 24, रा. वेताळनगर रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उमेश बाळासाहेब सोनवणे (वय 33 रा. सिहंगड कँम्पस , आंबेगाव बुद्रुक ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरुन जात असताना आरोपी विशालला फिर्यादी यांनी लिफ्ट दिली. त्यानंतर ' मला पैसे दे नाहीतर मी तुला पण मारीन, असे धमकावून, जबरदस्तीने फिर्यादी यांच्याकडून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे मदतीसाठी एका सोसायटीच्या मेनगेटमधून आत जात असताना आरोपीने हातात लाकडी फळी घेऊन फिर्यादीला मारहाण करण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीच्या मदतीसाठी जमलेले लोक पुढे येत असताना फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कथले पुढील तपास करीत आहेत.