द्या हो द्या लसीकरण केंद्र द्या! 'माननीयां'च्या अट्टहासापुढे महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:26 IST2021-03-16T20:16:42+5:302021-03-16T20:26:13+5:30
माननीयांच्या अट्टाहासाचे करायचे काय ? आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला प्रश्न

द्या हो द्या लसीकरण केंद्र द्या! 'माननीयां'च्या अट्टहासापुढे महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल
पुणे : पुण्यातल्या उपलब्ध लसीकरण केंद्रांचा घोळ अजूनही सुरु आहे. त्यातच आता आपल्या भागात किंवा आपल्याशी संबंधित रुग्णालयात लसीकरण केंद्र द्यावे यासाठी माननीयांची चढाओढ सुरु झाली आहे. मुळात लसीचा असलेला तुटवडा आणि त्यातच केंद्रांसाठी असलेले निकष यामुळे या माननीयांच्या अट्टाहासाचे करायचे काय असा प्रश्न आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
कोरोना लसीकरण गेल्या काही दिवसांपासुन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. ६० वर्षावरचे नागरिक तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक कोमार्बिडीटी असलेले नागरिक यांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेचे तसेच खासगी असे मिळुन एकुण ८४ लसीकरण केंद्र सध्या सुरु करण्यात आली आहेत. मात्र, सध्या लसीच्या तुटवड्यामुळे ही केंद्र देखील पुर्ण क्षमतेने सुरु नाही. त्यातच ही प्रक्रिया सुरु झाल्यापासुन लसीकरण केंद्राची मागणी करणाऱ्या पत्रांचा ढीगच पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे साठला आहे. आपल्या भागातल्या महापालिका किंवा ओळखीच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरु केले जावे अशी मागणी माननीयांकडुन करण्यात येते.
यामध्ये फक्त नगरसेवकच नाहीत तर पक्षाचे पदाधिकारी देखील सहभागी आहेत. “केंद्र सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेत नाही. त्यातच निकषांची पूर्तता होत नसेल तर शिफारस देखील करता येत नाही.” असे मत आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र यानंतरही नागरिकांच्या सोयीसाठीच माननीय विनंतीपासुन दबावापर्यंत वेगवेगळे मार्ग वापरत असल्याने या मागण्यांचे करायचे काय असा प्रश्न आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांना पडला आहे.