'४० लाख द्या', एमपीएससीचा पेपर आदल्या दिवशी देऊ, विद्यार्थ्यांना आलेल्या कॉल्सने सर्वत्र खळबळ
By नम्रता फडणीस | Updated: January 30, 2025 20:57 IST2025-01-30T20:56:15+5:302025-01-30T20:57:04+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणते, परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित

'४० लाख द्या', एमपीएससीचा पेपर आदल्या दिवशी देऊ, विद्यार्थ्यांना आलेल्या कॉल्सने सर्वत्र खळबळ
पुणे: ‘नमस्कार सर, महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल, त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील... अशाप्रकारे विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे कॉल्स काही विद्यार्थ्यांना आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, आयोगाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन करण्यात आले आहेत. एकाच विद्यार्थ्याला अजून दुसरा कॉल आला. त्यात आपण ‘गट ब’च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. तर आपल्यासाठी एक ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपली मूळ कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे. या संबंधित विद्यार्थ्याने तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणाही केली. ‘तर मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका.’, असे सांगितले.
या फोन कॉलमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नोकर भरतीत मोठा घोटाळा होणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण
परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून, या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उमेदवारांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच असे दूरध्वनी आल्यास contact-secretary @mpsc .gov.in या ईमेलवर यासंदर्भातील तक्रार दाखल करावी. उमेदवारांनी अशा प्रकरणांमुळे विचलित ना होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येत आहे असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिवांनी कळविले आहे.
एमपीएससीचा पेपर 40 लाख रुपयांमध्ये विकण्याच्या संदर्भात प्रसार माध्यमावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग मुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पेपर फोडणाऱ्या या टोळ्यांमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विशेष पोलीस पथक स्थापन करून प्रकरणाचा तपास करावा व सत्य विद्यार्थ्यांसमोर आणावे, नितीन आंधळे - स्पर्धा परीक्षार्थी