रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा; मेधा कुलकर्णींची अजित पवारांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:12 IST2025-05-01T12:11:04+5:302025-05-01T12:12:20+5:30
मी उदघाटनाच्या १० मिनिट लवकर आले होते, पण २० मिनिट अगोदर दादांनी उदघाटन केलं, मला वाईट तर वाटणारच

रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा; मेधा कुलकर्णींची अजित पवारांना विनंती
पुणे : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार होते. या कार्यक्रमाची वेळ सकाळी ६.३० वाजताची होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच त्या ठिकाणी पोहोचले आणि उद्घाटन केले. यावरून भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. माझी विनंती आहे की, दादांनी रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा असं त्यांनी सांगितलं आहे.
कुलकर्णी म्हणाल्या, मी विषय वाढवणार नव्हते. तुम्ही आला म्हणून सांगते. १० मिनिट लवकर उद्घाटन झालं. नक्कीच मला वाईट वाटतं, माझी दादांना विनंती आहे. दादांनी रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉल नुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं तिथे सगळेच येणार होते. बस किंवा फ्लाईट आपण ज्यासाठी पकडण्यासाठी जातो तेच आधी निघून गेलं तर वाईट वाटणारच ना. जी वेळ घोषित केली आहे. त्याआधी उद्घाटन करू नये. मी उदघाटनाच्या आधी १० मिनिट लवकर आले होते. पण दादांनी २० मिनिटापूर्वीच उद्घाटन केलं. पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेल. आमचे तिन्ही नेते जास्त जास्त काम करतात ते आमचे आदर्श आहेत. दादांनी वेळेच्या पूर्वी उद्घाटन करू नये एवढीच माझी विनंती आहे.
दादा, ६.३० ची वेळ होती. आता ६.२४ वाजत आहेत. तुम्ही आधीच उद्घाटन केले, असे मेधा कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगत, नाराजी व्यक्त केली. यानंतर, अजित पवारांनी मला माहिती नव्हते, परत उद्घाटन करू असे म्हटले. अजित पवारांच्या उत्तरावर मेधा कुलकर्णी यांनी, असे कसे दादा. असे होत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर पुन्हा अजित पवार यांनी इमारतीचे उद्घाटन केले.
दरम्यान आज सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर यादरम्यानचा उड्डाणपूल खुला करण्यास अखेर मुहूर्त मिळाला. या एकेरी उड्डाणपुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.