केशवनगरमध्ये घोलप गँगचा तरुणावर खुनी हल्ला; सात जणांवर गुन्हा, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:44 IST2026-02-11T17:43:53+5:302026-02-11T17:44:17+5:30
जुन्या वादातून घोलप गँगकडून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणाचे अपहरणही केले.

केशवनगरमध्ये घोलप गँगचा तरुणावर खुनी हल्ला; सात जणांवर गुन्हा, चौघांना अटक
पिंपरी : जुन्या वादातून घोलप गँगकडून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणाचे अपहरणही केले. ही घटना मंगळवारी (दि. १०) रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास केशवनगर येथील मराठी शाळेसमोर घडली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी अनिल घोलप (३१, शिरगाव परंदवाडी, ता. मावळ), मयूर अनिल घोलप (३३), शुभम विनायक चौधरी (२९, गावडे भोईर आळी, चिंचवड), आदित्य अशोक चव्हाण (२९, भिमनगर, चिंचवड), मंगेश नंदकुमार सांगळे (२७, काकडे पार्क, चिंचवड), प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे (२३, मोरेवस्ती, चिखली) व समीर कोंडीराम भोईर (चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील चौधरी, सांगळे, साबळे आणि भोईर या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आशितोष संतोष वराडे (२२, वराडे चाळ, गावडे भोईर आळी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांनी मंगळवारी याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी केशवनगर परिसरातून जात असताना संशयितांनी कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करण्यात आली. गावडे तलाव परिसरात नेऊनही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.