तरुणाला इंस्ट्राग्रामवरची ओळख करणं महागात पडलं; तरुणीने धमकी देत २० लाखांना लुटलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:39 IST2021-08-20T16:39:05+5:302021-08-20T16:39:19+5:30
धमकी देत ५० लाख रूपयांची खंडणी मागून तडजोडीअंती २० लाख रूपयांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी एका महिलेसह नऊ जणांवर लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाला इंस्ट्राग्रामवरची ओळख करणं महागात पडलं; तरुणीने धमकी देत २० लाखांना लुटलं
पुणे : इंस्ट्राग्रामवर महिलेशी झालेल्या ओळखीने तरूणाला भेटायला बोलावून २० लाखांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५० लाख रूपयांची खंडणी मागून तडजोडीअंती २० लाख रूपयांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी एका महिलेसह नऊ जणांवर लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मांजरी येथील एका २० वर्षीय तरूणाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने तरुणासोबत इंस्ट्राग्रामवर ओळख वाढवली आणि त्याला उरळी कांचन येथे भेटायला बोलावले. त्यांची खास भेटण्याची व्यवस्था करून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेने इतर साथीदारांना बोलावत त्याला मारहाण करून त्याच्या पाकिटातील ३ हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतल्यानंतर खंडणी मागण्याच्या उददेशाने गाडीत बसविले. आणि यवत पोलीस ठाण्याच्या समोर गाडी नेत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविली.
इतर आरोपींमार्फत तरुणाला संपर्क साधून बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर ५० लाख रूपये द्यावे लागतील. अशी धमकी देत तडजोडीअंती २० लाख रूपये फिर्यादीकडून स्वीकारण्यात आले. तरुण घाबरला असल्याने आणि समाजात बदनामी होईल या भीतीपोटी तक्रारीस विलंब लागल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात आले आहे.