GBS Virus: बारामतीत ‘जीबीएस’ने पुन्हा डोके वर काढले; शहरातील १५ वर्षीय युवकास लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:10 IST2025-04-25T20:09:44+5:302025-04-25T20:10:26+5:30
युवकाची परिस्थिती बेताची असून त्याचे वडील अपंग शेतकरी आहेत, सध्या त्यांना युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे

GBS Virus: बारामतीत ‘जीबीएस’ने पुन्हा डोके वर काढले; शहरातील १५ वर्षीय युवकास लागण
बारामती : पुणे शहरात भीतीदायक वातावरण निर्माण करणाऱ्या 'जीबीएस’ने काढता पाय घेतलेला असतानाचा बारामती शहरात मात्र या आजाराने डोके वर काढले आहे. शहरात कसबा परिसरातील एका १५ वर्षीय युवकास जीबीएस’ आजाराची लागण झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या युवकावर पुणे शहरातील नवले रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.महेश जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, संबंधित १५ वर्षीय युवक कसबा जामदार रोड येथे वास्तव्यास आहे. बुधवारी (दि २३) रात्री नेहमीप्रमाणे झोपी गेला. मात्र,गुरुवारी(दि २४) सकाळी त्याला उठता येत नव्हते. तसेच त्याला अशक्तपणा देखील जाणवत होता. त्यामुळे बारामती कसबा येथील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या डाॅक्टरांनी या युवकाला पुढे शहरातील भाग्यजय हाॅस्पिटलमध्ये डाॅ.आर.डी.वाबळे यांच्याकडे पाठवले. या ठीकाणी मेंदु विकास तज्ञ डाॅ.सुयोग दोशी यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर डाॅ. दोशी यांनी त्याची तपासणी केल्यानंतर यांनी हा युवक संशयित 'जीबीएस’ रुग्ण असल्याची शक्यता व्यक्त करत त्याला उपचारासाठी पुण्याला पाठविण्याची शिफारस केली. त्यानंतर या युवकाला पुणे शहरातील काशीबाई नवले हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. शुक्रवारी(दि २५) या युवकाला या ठीकाणी दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तसेच त्याला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मनोज खाेमणे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार सबंधित युवक वास्तव्यास असलेल्या परिसराचे तातडीने सर्व्हेक्षण हाती घेण्यात येत आहे. तेथील संशयित रुग्णांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करुन लक्षणे आढळल्यास उपचार करण्यात येतील. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला गरज पडल्यास पुणे शहरात उपचारास पाठविण्याची शिफारस करण्यात येइल. दरम्यान,त्या युवकाचे ग्रामीण भागातील यात्राजत्रांमधून फिरणे झाले होते. त्याठीकाणी त्याने काही पदार्थ खाल्ले होते. अशी माहिती संबंधित युवकाच्या कुटुंबियांनी दिल्याचे डाॅ.जगताप यांनी सांगितले. आरोग्य विभाग याबाबत सखोल तपासणी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, या युवकाची परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील अपंग शेतकरी आहेत. सध्या त्यांना युवकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
बारामती शहरात यापुर्वी एका ६५ वर्षीय रुग्णात जीबीएस आजाराची लक्षणे आढळली होती.मात्र, या रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आढळला होता. तसेच पुणे शहरात सिंहगड रोड परीसरात वास्तव्यास असणाऱ्या बारामतीकर युवतीला जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या युवतीचा जीबीएस सदृश्य आजाराने मृत्यु झाला. तिला पुणे शहरातच या आजाराची लागण झाली होती. आता बारामतीत पुन्हा या आजाराने डोके वर काढल्याचे चित्र आहे.