दुचाकीच्या स्टिकरवरून लागला हनुमान टेकडीवर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा शोध

By नितीश गोवंडे | Updated: January 8, 2025 20:21 IST2025-01-08T20:21:29+5:302025-01-08T20:21:53+5:30

- एक महिन्याच्या अंतराने शोधत होते सावज

Gang that robbed citizens on Hanuman Hill was traced through a bike sticker | दुचाकीच्या स्टिकरवरून लागला हनुमान टेकडीवर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा शोध

दुचाकीच्या स्टिकरवरून लागला हनुमान टेकडीवर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा शोध

पुणे : हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्याकडील सोनसाखळी चोरून पसार झालेल्या चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी पकडले. चोरट्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये टेकडी परिसरात लुटमारीचे चार गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. हे चोरटे प्रामुख्याने टेकडीवर फिरण्यासाठी आलेल्या युवक-युवतींना टार्गेट करत होते. तसेच एक महिन्याच्या अंतराने ते सावज हेरून लुटत असल्याचे देखील पुढे आले आहे.

स्वप्नील शिवाजी डोंबे (३२, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), अनिकेत अनिल स्वामी (२१, मूळ रा. जनता वसाहत,पर्वती पायथा, सध्या रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. डोंबे आणि स्वामी सराईत चोरटे आहेत. यापूर्वी त्यांच्याविरोधात डेक्कन आणि सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात लुटमारीचे गुन्हे दाखल झाले होते, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चार दिवसांपूर्वी हनुमान टेकडीवर मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून डोंबे आणि स्वामी यांनी तिच्याकडील सोनसाखळी चोरली होती. याबाबत युवतीने पोलिसांकडे फिर्यादी दिली होती. डेक्कन पोलिसांच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. आरोपी गुन्हा करुन दुचाकीवरून पसार झाले होते. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनंतर दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हनुमान टेकडी परिसरात लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. दोघांनी गेल्या काही महिन्यात या भागात लुटमारीचे चार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे निरीक्षक प्रसाद राऊत, उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार राजेंद्र मारणे, दत्तात्रय शिंदे, धनश्री सुपेकर, गभाले, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, महेश शिरसाठ यांनी ही कारवाई केली.

टेकडीवर कोयता घेऊन फिरणारा अटकेत..
हनुमान टेकडीवर कोयता घेऊन लुटणारीच्या तयारीत असलेल्या आणखी एका चोरट्याला डेक्कन पोलिसांनी पकडले. माँटी उर्फ तेजस खराडे (रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खराडे हा देखील साराईत चोरटा असून, त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता, डेक्कन, दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दुचाकीवरील स्टीकरवरून शोधले आरोपी..
हनुमान टेकडीवर लूटमार करणारे चोरटे डोंबे आणि स्वामी यांनी गुन्हा करताना वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी वापरली होती. आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहन क्रमांक नसलेली दुचाकी पांडव नगर पोलिस चौकीसमोर आढळून आली होती. दुचाकीवर एक स्टीकर होते. त्या स्टीकरवरून पोलिसांनी डोंबे आणि स्वामी या आरोपींचा माग काढला.

सीसीटीव्ही कॅमेरे अन् गस्त..
बोपदेव घाट अत्याचार प्रकरण, तसेच टेकड्यांवर झालेल्या लूटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता टेकडीकडे जाणार्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. टेकडीच्या माथ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. शहरातील सर्व टेकड्यांवर लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. अंधार पडल्यानंतर टेकडीवर फिरायला जाणार्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त घालणार्या पोलिसांकडून मेगाफोनद्वारे आवाहन केले जात असून, टेकडीच्या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी शक्यतो अंधार पडल्यानंतर निर्जन ठिकाणी, तसेच टेकडीवर फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केलेे आहे.

Web Title: Gang that robbed citizens on Hanuman Hill was traced through a bike sticker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.