Pune Crime: कोथरूडमध्ये टोळक्याचा राडा, ८ दुचाकी फोडून मारहाण; बारा जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 11:15 IST2024-02-17T11:15:25+5:302024-02-17T11:15:52+5:30
बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...

Pune Crime: कोथरूडमध्ये टोळक्याचा राडा, ८ दुचाकी फोडून मारहाण; बारा जणांविरुद्ध गुन्हा
पुणे : किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूडमधील जयभवानीनगर परिसरात घडली. टोळक्याने एका दुकानासमोर लावलेल्या आठ दुचाकींची तोडफोड करून दुकानदाराला धमकावले. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौरभ संतोष गाऊडसे (२३, रा. जयभवानीनगर, कोथरूड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, यश श्याम भिलारे, मंदार रायरीकर, साहिल भायगुडे, मनीष मराठे, महेश पाणगावकर (सर्व रा. जयभवानीनगर, कोथरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अडागळे यांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार सौरभ ओळखीचे आहेत. सौरभ त्याचा मित्र गौरव गायकवाड याच्याशी जयभवानीनगर परिसरातील शिवराज चौकात गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आमच्या चौकात का थांबला, अशी विचारणा करून आरोपींनी सौरभला मारहाण केली. आरोपी पाणगावकर याने त्याच्या हातातील कडे सौरभच्या डोक्यात मारल्याने त्याला दुखापत झाली. सहायक पोलिस निरीक्षक अडागळे तपास करत आहेत.
विजय गणेश ठोंबरे (४४, रा. माताळवाडी फाटा, भूगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठोंबरे यांचे जयभवानीनगर परिसरात दुकान आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरव सचिन गायकवाड (२१), सुयोग संदीप दवंडे (१९), सुयश दत्तात्रय पोळेकर (१९) यांच्यासह चौघा अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ याला जयभवानीनगर परिसरातील तरुणांनी मारहाण केल्याचे समजल्यानंतर त्याचे मित्र आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या दुकानाच्या दरवाजावर सिमेंटचा गट्टू फेकून मारला. दुकानासमोर लावलेल्या आठ दुचाकींची तोडफोड केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.