Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 22:22 IST2025-11-01T22:20:44+5:302025-11-01T22:22:23+5:30
Ganesh Kale News: पुण्यात गणेश काळे याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणातील चौघांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
Ganesh Kale Pune Crime News: पुण्यात गणेश काळे या ३२ वर्षीय तरुणाची शनिवारी (१ नोव्हेंबर) दुपारी हत्या करण्यात आली. दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गणेशवर गोळीबार केला. चार गोळ्या लागल्यानंतर आरोपींनी गणेशवर कोयत्याने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर फरार झालेल्या संशयित आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. चौघांना पोलिसांनी पकडले असून, दोघे अल्पवयीन आहेत.
गणेश काळेची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ११ पथके स्थापन करून वेगवेगळ्या भागात रवाना केली होती. रात्री पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले. चारही आरोपींना खेड शिवारातून ताब्यात घेण्यात आले. यातील दोघे अल्पवयीन आहेत. अमन शेख, अरबाज पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
साताऱ्याच्या दिशेने पळून जात होते. खेड-शिवापूरच्या परिसरात त्यांना अटक करण्यात आली. अमन शेख, अरबाज पटेल या दोघांसह चारही आरोपी आंदेकर टोळीशी संबंधित असल्याची माहिती माहिती पोलीस सूत्रांनी प्राथमिक तपासाअंती दिली.
आधी रिक्षा अडवली नंतर गोळ्या घातल्या
गणेश काळे हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. तो दुपारी तीनच्या सुमारास येवलेवाडीतून खडीमशीन चौकाकडे येत होता. त्यावेळी दोन दुचाकीवरील चार हल्लेखोर त्याच्या मागावर होते. त्यांनी तेथील पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो गडबडला. मात्र, त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. त्याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी चार गोळ्या मानेत, छातीत व पोटात घुसल्या. त्यामुळे, तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर, दोघा हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याचे वार केले. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.
एकाच दुचाकीवरून चौघे गेले पळून
पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी मिळून आली आहे. तिचा वापर हल्लेखोरांनी केला आहे. येताना ते दोन दुचाकीवर आले होते. मात्र पळून जाताना एक दुचाकी घटनास्थळीच सोडून एकाच दुचाकीवरून चौघांनी पळ काढला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्यासह कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, गणेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे.