Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 21:41 IST2025-11-01T21:38:49+5:302025-11-01T21:41:43+5:30
Ganesh Kale Shot Dead in Pune: भरदिवस आणि पेट्रोल पंपासमोर करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेने पुणे हादरले. गणेश काळेच्या हत्येने पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपीच्या भावाचा शनिवारी (१ नोव्हेंबर) भरदुपारी चौघांनी ४ गोळ्या झाडून तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौक ते येवलेवाडी दरम्यानच्या पेट्रोलपंपासमोर दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. गणेश किसन काळे (३२, रा. येवलेवाडी) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा गणेश भाऊ होता. दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी जवळून बंदुकीने गोळ्या मारल्याने आणि डोक्यात कोयत्याने वार केल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बबलू आणि तम्मा या दोघांसह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश काळे कोण, त्याची हत्या कशी करण्यात आली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो. तो दुपारी तीनच्या सुमारास येवलेवाडीतून खडीमशीन चौकाकडे येत होता. त्यावेळी दोन दुचाकीवरील चार हल्लेखोर त्याच्या मागावर होते. त्यांनी तेथील पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो गडबडला. मात्र, त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. त्याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी चार गोळ्या मानेत, छातीत व पोटात घुसल्या. त्यामुळे, तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर, दोघा हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याचे वार केले. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.
पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी मिळून आली आहे. तिचा वापर हल्लेखोरांनी केला आहे. येताना ते दोन दुचाकीवर आले होते. मात्र पळून जाताना एक दुचाकी घटनास्थळीच सोडून एकाच दुचाकीवरून चौघांनी पळ काढला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्यासह कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, गणेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये झाली होती वनराज आंदेकरांची हत्या
नाना पेठेत १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री नऊच्या सुमारास भरचौकात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा पिस्तुलातून गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत निर्घृण खून करण्यात आला. त्यामध्ये समीर काळे आरोपी आहे. त्यानेच वनराज यांच्यावर गोळ्या झाडल्याचे समोर आले होते.
वनराजच्या खुनाचा बदला म्हणून दोन महिन्यांपूर्वी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा ५ सप्टेंबर रोजी रात्री गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्याच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीला गजाआड केले आहे. तर आता वनराज यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे संशयाची सुई आंदेकर टोळीच्या दिशेने फिरत असल्याचे दिसून येते.
मालमत्तेचा वाद आणि रक्तरंजित संघर्ष
आंदेकर आणि कोमकर कुटुंबियातील मालमत्तेचा वाद आणि टोळीयुद्धातील संघर्षातून वनराज यांचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये समीर काळे याचा देखील समावेश होता.
वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी वापरलेली पिस्तुले समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के आणि संगम वाघमारे यांनी मध्यप्रदेशातून आणली होती. हे चौघे कारने धुळे मार्गे मध्यप्रदेशात गेले होते. तेथून त्यांनी ९ पिस्तुले आणली होती.
टोळ्यांतील वैर टोकाला
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या आयुष कोमकर खुन प्रकरणाने शहरात खळबळ माजवली होती. त्या घटनेतही आंदेकर टोळीने वर्चस्व आणि बदला म्हणून हल्ला केला होता. आता गणेश काळेचा खून घडल्याने या टोळ्यांतील वैर आणि सूडभावनेने पुन्हा डोकं वर काढल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान आंदेकर टोळी, कोमकर आणि सोम्या गायकवाड टोळी सध्या कारागृहात आहेत. दोन्ही टोळ्यांना मकोका लागला आहे. तर दुसरीकडे बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकरचे आर्थिक साम्राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. मात्र त्यानंतरही ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
आरोपींचा शोध सुरू, अटकेनंतरच हत्येचे कारण कळेल
"दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गणेश काळे याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत खून केला आहे. चार ते पाच राऊंड फायर झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांना घटनास्थळी हल्लेखोरांची दुचाकी मिळून आली आहे. परिमंडळ ५ ची आणि गुन्हे शाखेची दहापेक्षा अधिक पथके आरोपींचा त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडल्यानंतरच खुनाचे खरे कारण समोर येईल. गणेश हा वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे", असे परिमंडळ ५चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.