बिडकर विरुद्ध धंगेकर; वसंत मोरेंची कसोटी, खुल्या जागेवर अनेकांचा डोळा, नगरसेवकपद घरातच ठेवण्याची सेंटिग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:34 IST2025-11-12T11:23:20+5:302025-11-12T11:34:12+5:30
प्रारूप आरक्षण सोडतीत अनेक नगरसेवकांना दोन-तीन टर्मपासून ठाण मांडून असलेले प्रभागही या आरक्षणामुळे गमवावे लागले आहेत.

बिडकर विरुद्ध धंगेकर; वसंत मोरेंची कसोटी, खुल्या जागेवर अनेकांचा डोळा, नगरसेवकपद घरातच ठेवण्याची सेंटिग सुरू
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप आरक्षण साेडतीत अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. तर काही माजी नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने पत्नी किंवा मुलीला निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थितीत नगरसेवकपद घरातच ठेवण्यासाठी सेंटिग सुरू झाली आहे.
प्रारूप आरक्षण सोडतीत अनेक नगरसेवकांना दोन-तीन टर्मपासून ठाण मांडून असलेले प्रभागही या आरक्षणामुळे गमवावे लागले आहेत. काहींना प्रभाग महिला राखीव झाल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांची पत्नी किंवा कुटुंबातील महिलेला या जागेवर उभे करावे लागणार आहे किंवा त्यांना खुल्या जागेतून निवडणूक लढवावी लागणार आहे.
इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
आगामी महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमुळे प्रभागाचे राजकीय चित्र स्पष्ट झाल्याने आता माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी काही जणांनी आतापासूनच सेटिंग लावायला सुरुवात केली आहे. सोयीचे आरक्षण पडलेल्या इच्छुकांनी नेत्यांना फोन आणि मेसेज पाठविले आहेत.
आरक्षण सोडतीने जागांची उलथापालथ, खुल्या जागेवर अनेकांचा डोळा
आरक्षण सोडतीने प्रभागांतील जागांची उलथापालथ झाली आहे. त्यामुळे आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना आता खुल्या जागेवरून निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर-सॅलसबरी पार्कमध्ये ओबीसी महिला राखीव झाला आहे. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे ओबीसी जागेवर लढत होते. मात्र आता भिमाले यांची अडचण झाली आहे. त्यामुळे भिमाले यांना खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएममध्ये एससी महिला आरक्षण पडले नाही. त्यामुळे माजी नगरसेविका पल्लवी जावळे या सर्वसाधारण महिलामधून निवडणूक लढविणार आहेत.
प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडीमध्ये एकच जागा खुली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे आणि सनी निम्हण यांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषणमध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले नाही. त्यामुळे माजी नगरसेवक ज्याेती कळमकर यांच्या जागी त्यांचे पती गणेश कळमकर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवामध्ये सर्वसाधारणसाठी एक जागा असल्यामुळे माजी नगरसेवक उमेश गायकवाड, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक ३२ वारजे-पॉप्युलर नगर एकच जागा खुली असल्यामुळे माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
बिडकर विरुद्ध धंगेकर निवडणूक होण्याची शक्यता
प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय यामध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर हे सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढणार आहेत. याच प्रभागातून माजी आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानात न उतरता आपल्या मुलाला खुल्या जागेतून मैदानात उतरविणार आहेत. त्यामुळे बिडकर विरुद्ध धंगेकर निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रभाग २३ रविवार पेठ-नाना पेठमधून ओबीसी महिला या आरक्षित जागेवरून धंगेकर यांच्या पत्नी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
पती-पत्नी, पिता-पुत्र निवडणूक लढविणार
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पदमावतीमधून माजी नगरसेविका अश्विनी कदम आणि त्यांचे पती नितीन कदम तर प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा पाच सदस्यीय प्रभाग असून, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वसंत मोरे यांची येथे कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ४० मधून आपल्या वसंत मोरे स्वत:च्या मुलाला निवडणुकीत उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत पती-पत्नी, पिता-पुत्र निवडणुकीत दिसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.