Maharashtra: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासूनच, कारखानदारांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 02:14 PM2023-10-17T14:14:43+5:302023-10-17T14:18:36+5:30

उद्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता...

Galp Season From November 1 onwards, the factory workers visited the Cooperative Minister | Maharashtra: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासूनच, कारखानदारांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट

Maharashtra: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासूनच, कारखानदारांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट

पुणे : कर्नाटकमध्ये गाळप हंगाम यंदा लवकर म्हणजे एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील गाळप हंगामही त्याच दिवशी सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. सोमवारी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची राज्यातील काही साखर कारखानदारांनी भेट घेऊन सध्याची वस्तुस्थिती सांगितली. तसेच, महाराष्ट्रातही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची विनंती केली. सहकारमंत्र्यांनीही सहमती दर्शवली असून उद्याच्या मंत्री समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे.

यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होऊन किमान २० ते २५ टक्के घट अपेक्षित मानली जाते. यंदा राज्यात १ हजार २२ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून, इथेनॉलकरिता वळविण्यात येणाऱ्या साखरेव्यतिरिक्त ८८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन १०५ लाख टन इतके झाले होते. यामध्ये यंदा घट अपेक्षित आहे. कर्नाटकमधील कारखान्यांची धुराडी एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे अजूनही महाराष्ट्रात गाळप हंगाम कधी सुरू करायचा यावर चर्चाच सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करायचा असे सांगितले होते. त्यामुळे राज्यातील कारखानदार हवालदिल झाला आहे.

या सगळ्या घडामोडींवर राज्यातील काही कारखानदारांनी सोमवारी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पुण्यात साखर संकुलात भेट घेतली. यावेळी सध्या परिस्थितीचा आढावा दिला. कर्नाटकने गाळपाच्या घोषणा केली आहे. त्यामुळे आता मजुरांच्या टोळ्या हळूहळू तिकडे वळू लागले आहेत. शिवाय महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील साखर कारखान्यांकडून ऊस पळवापळवी होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकमध्ये पळवला जातो. त्यामुळे आपला देखील गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच सुरू करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, यावर्षी सोलापूर, मराठवाडा, नगर-पुणे या पट्ट्यात ऊस उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के घट येईल असा कयास आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालामध्ये देखील ही गोष्ट प्रामुख्याने नमूद करण्यात आली असून त्यावर मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा होईल.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ऊस गळीत हंगामासंदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, कृषिमंत्री त्याचबरोबर साखर संघ, राज्य सहकारी बँक, यांच्या प्रतिनिधींना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.

ऊसतोड मजुरांचा प्रश्न गंभीर

राज्यातील गाळप हंगामाचा मुहूर्त अद्यापही ठरला नाही. एक की १५ नोव्हेंबर हे यावर लवकरच निर्णय होईल. घटस्थापना झाली की ऊसतोड मजुरांच्या टोळ्या सज्ज होतात. तर, काही नियोजित ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थही होतात. कर्नाटकने गाळप हंगामाची तारीख जाहीर केल्याने काही टोळ्या तिकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. या टोळ्यांना आधी उचल द्यावी लागत असते. अनेक कारखान्यांनी उचल देखील दिली आहे. पण, आधी हंगाम ज्याचा असेल तिकडे या टोळ्या जातात. राज्यातील हंगाम लवकर जाहीर झाला नाही तर पुन्हा मजुरांचा प्रश्नदेखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Galp Season From November 1 onwards, the factory workers visited the Cooperative Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.