दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 18:34 IST2025-07-17T18:33:53+5:302025-07-17T18:34:43+5:30

मित्राचे पैसे लुटण्यासाठी मित्र त्याचा पाठलाग करत धाराशिव वरून थेट पुण्यात आला होता

Friends don't stay friends A friend hatched a plot to rob a friend of Rs 40 lakhs the crime was solved within 24 hours | दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा

दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा

पुणे : धाराशिव येथून स्टिल व्यावसायिक मित्रासोबत शहरात आलेल्या मित्रानेच त्याच्याकडील ४० लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. आंबेगावपोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चोवीस तासाच्या आत पोलिसांनी आरोपी मित्रासह त्याच्या साथीदारांना अटक केली. तीन आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त मुलाला यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. पैशांच्या मोहापायी व्यावसायिकाच्या मित्रानेच हे कृत्य आपल्या अन्य साथीदारांसह केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

मित्राचे पैसे लुटण्यासाठी मित्र त्याचा पाठलाग करत थेट पुण्यात आला होता. मंगेश दिलीप ढोणे (३२, रा. रामलिंगनगर, येडशी, जि. धाराशिव) असे या लुटारू मित्राचे नाव आहे. त्याच्यासह पोलिसांनी प्रदीप रामदास डोईफोडे (३५, रा. इंगळेनगर, भुगाव) याला अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अभिजित विष्णू पवार (३२, रा. रामलिंगनगर, येडशी, जि. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तिन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी (दि. १५) सकाळी पावणे नऊच्या सुमारास आंबेगावमधील बाबजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर पवार आणि त्यांचा मित्र ढोणे रस्त्याने पायी चालत निघाले होते. त्या वेळी ढोणेच्या खांद्यावर असलेली ४० लाख रोख रकमेची बॅग चोरट्यांनी पळवली. हा सर्व लुटीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला होता.

आधी रेकी अन् नंतर लूट..

व्यवसायिक पवार आणि ढोणे हे दोघे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. ढोणेला पवार यांच्या आर्थिक उलाढालीबाबत माहिती होती. पवार अनेकदा ढोणे सोबत असताना त्यांचे आर्थिक व्यवहार करत असत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना पुरवलेल्या मालाचे पैसे जमा करण्यासाठी पवार पुण्याला निघणार असल्याचे ढोणेला माहिती होते. ढोणेला पैशांची लालसा झाली. त्याने ही माहिती त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीला दिली. तो देखील धाराशिव जिल्ह्यातील राहणारा. ढोणे आणि इतर तिघांनी ही रोकड लुटण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांना शहरातून साथ दिली ती प्रदीप डोईफोडे याने. त्याचीच थार गाडी गुन्हा करण्यासाठी वापरली. रोकड हिसकावल्यानंतर आरोपींनी खेड, पाटस, जामखेड मार्गे धाराशिव जिल्हा गाठला. रोकड हिसकावताना डोईफोडे याच्यासोबत आणखी दोघे होते. पवार गावातून निघाल्यापासून त्यांच्या ट्रॅव्हल्सचा एका चारचाकी गाडीने पाठलाग करण्यात आला. पवार यांच्या ओळखीच्या विधिसंघर्षग्रस्त मुलाने याबाबतची टीप ढोणेला दिली. त्यानंतर ढोणे याने इतर दोन आरोपींच्या संपर्कात राहून डोईफोडे मार्फत ही लूट केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून ९ लाख ३५ हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश..

सकाळी सहाच्या सुमारास पवार हडपसर गाडीतळ येथे पोहोचले. त्यानंतर त्यांचा मित्र मंगशे ढोणे याच्या आयशर गाडीतून आंबेगाव परिसरात आले. त्यावेळी ढोणे रोकड असलेली बॅग खांद्यावर घेऊन चालत होता. त्यावेळी थार गाडीतून आलेल्या चोरट्यांनी ढोणे याच्या खांद्यावरील बॅग हिसकावून पळ काढला. त्यावेळी पवार यांनी ड्रायव्हरच्या दिशेने धावत जाऊन थारची चावी काढण्याचा प्रयत्न केला. परंतू चालकाने त्यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारल्याने ते खाली पडले. त्यानंतर चोरटे फरार झाले होते. पोलिसांनी तपास करताना, चोरट्यांनी पवार यांना मारहाण केली. परंतू ढोणे याला हातही लावला नाही ही बाब अचूक हेरली. दुसरीकडे तांत्रिक तपासात ढोणे हा धाराशिव येथील इतर तीन व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. शेवटी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने आपणच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहीते, निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय कुंभार, अंजुम बागवान, आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अशिष कवठेकर, उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

फरार आरोपींचा शोध सुरु 

व्यावसायिकाच्या मित्रानेच आपल्या अन्य साथिदारांसोबत मिळून, पैसे असलेली बॅग लंपास केली होती. आत्तापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. अन्य काही आरोपी फरार असून, आम्ही त्यांचा शोध घेत आहेत.- शरद झिने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आंबेगाव पोलिस ठाणे

Web Title: Friends don't stay friends A friend hatched a plot to rob a friend of Rs 40 lakhs the crime was solved within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.