गोल्ड माइन कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक; तब्बल १२५ गुंतवणूकदारांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:24 IST2025-02-24T13:24:17+5:302025-02-24T13:24:47+5:30
गुंतवणूक केल्यानंतर काही तुटपुंजा रकमा आरोपीने गुंतवणूकदारांना देत त्यांना झुलवत ठेवले, तसेच विश्वास संपादन केला

गोल्ड माइन कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक; तब्बल १२५ गुंतवणूकदारांना गंडा
पुणे: गोल्ड माइन कंपनीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने १२५ गुंतवणूकदारांना तब्बल १ कोटी १७ लाख ७६ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात किशोर शंकर चेन्नूर (रा. गंजपेठ, मंगलक्लब मित्रमंडळाशेजारी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रमोद मधुकर गायकवाड (३०, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, २०१९ मध्ये फिर्यादी प्रमोद गायकवाड यांची ओळख आरोपी किशोर चेन्नूर याच्यासोबत झाली होती. फोनवर व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संभाषण सुरू होते. ऑगस्ट २०२३ मध्ये किशोर चेन्नूर यांनी गायकवाड यांना फोन करून बोलावून घेतले. त्याने गायकवाड यांना मला शेअर मार्केटचे चांगले नॉलेज असल्याचे व त्यांची गोल्ड माइन्स कंपनी असल्याचे सांगितले. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा २० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवले. तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास तुम्हालाही चांगला परतावा मिळवून देतो असे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने त्याच्या गोल्ड माइन कंपनीचे प्रोफाइल दाखवले. त्यानंतर दोन महिन्यांनी गायकवाड यांनी त्याला १ लाख रूपये पाठवले.
एक महिन्यानंतर चेन्नूर याने महिन्याला २० हजार याप्रमाणे चार महिन्यांचे मिळून एक लाख रुपये परतावा दिला. याबाबत फिर्यादी यांनी मित्रांना सांगितल्यानंतर तब्बल १२५ जण साखळी पद्धतीने चेन्नूर याला जोडले गेले. सर्वांनी मिळून त्याच्याकडे १ कोटी ५७ लाख २४ हजारांची गुंतवणूक केली. दरम्यानच्या काळात काही तुटपुंजा रकमा आरोपीने गुंतवणूकदारांना देत त्यांना झुलवत ठेवले, तसेच विश्वास संपादन करण्यासाठी चेन्नूर याने दरम्यानच्या काळात ३९ लाख ४७ हजार परत दिले. काही काळानंतर चेन्नूर याने जागतिक मंदीचे कारण दाखवून कंपनी लॉसमध्ये असल्याचे सांगत पैसे पाठवणे बंद केले. त्यानंतर चेन्नूर हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. तुम्हाला जे करायचे ते करा मी कोणाला घाबरत नाही, माझी खूप ओळख आहे, असे सांगत गुंतवणूकदारांना धमकी दिली, तसेच त्यांचे १ कोटी १७ लाख ७६ हजार परत केले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल्ल यांच्याकडे तक्रार केली. खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.